(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Retail Inflation Rate : सप्टेंबर महिन्यात महागाई नरमली, किरकोळ महागाई दर तीन महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर
Retail Inflation Rate : किरकोळ महागाई दर हा तीन महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर आल्याचं राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीमधून स्पष्ट झालं आहे.
मुंबई : सप्टेंबर महिन्यामध्ये भारतातील किरकोळ महागाई दर (Inflation Rate) हा 5.02 टक्क्यांवर आला असल्याचं राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीमधून समोर आलं आहे. दरम्यान, डिसेंबरपर्यंत किरकोळ महागाई दर कमीच राहिल्यास येत्या काळात रेपो रेटमध्ये देखील घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर आरबीआयकडून (RBI) महागाई दर हा दर चार टक्क्यांच्या खाली ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. तर सप्टेंबर महिन्यात महागाई दर हा निच्चांकी पातळीवर गेल्याने आता सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
महागाई दराचा आलेख
ऑगस्टमध्ये भारतातील किरकोळ महागाई दर हा 6.83 टक्क्यांवर गेल्याचं पाहायला मिळालं होतं. तर जुलै महिन्यात महागाई दर हा 7.44 टक्क्यांवर पोहचला होता. तर सप्टेंबर महिन्यात हाच दर 5.02 टक्क्यांवर घसरला असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान आॅगस्ट महिन्यात खाद्य महागाई दर हा 9.94 टक्क्यांवर पोहचला होता. तर हाच दर सप्टेंबर महिन्यात 6.30 टक्क्यांवर घसरला आहे.
शहरी महागाई दरामध्येही घसरण
सप्टेंबर महिन्यातील शहरी महागाई दर 4.65 टक्क्यांवर आलाय. तर हाच शहरी महागाई दर हा आॅगस्ट महिन्यात 6.59 टक्क्यांवर होता. ग्रामीण महागाई दर हा 5.33 टक्क्यांवर पोहचला आहे. तर ऑगस्ट महिन्यात हा दर 7.02 टक्क्यांवर पोहचला होता.
महागाई नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न
रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठकीत रेपो रेट जसे आहेत तसेच ठेवण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेकडून घेण्यात आला होता. देशाचा आर्थिक विकास दर 6.5 टक्के राहण्याचा अंदाज आहे. तसेच जुलै आणि ऑगस्ट महिन्यात खाद्य महागाई मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे एकूणच महागाई दरात मोठी वाढ झाली होती. मात्र, आता महागाई दर नियंत्रणात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. डाळी, मसाले आणि भाजीपाल्यांच्या दरात वाढ झाल्याने महागाई वाढली होती. रिझर्व्ह बॅंकेच्या या पत्रकार परिषदेत यंदाच्या आर्थिक वर्षात महागाई दर 5.4 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जागतिक बाजारात अस्थिरता असल्याने आर्थिक मंदीची झळ अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता आहे. महागाई दर 4 टक्क्यांवर कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही रिझर्व्ह बॅंकेकडून सांगण्यात आले तसेच महागाई दर कमी करण्याच्या उद्दिष्टानं काम करत असल्याचं रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असल्याचं चित्र पाहायला मिळतय.
हेही वाचा :
Repo Rate RBI : रिझर्व्ह बँकेचा सर्वसामान्यांना दिलासा, रेपो रेट जैसे थे, EMI वाढणार नाही!