एक्स्प्लोर
निवडणूक लढवणार की नाही? शरद पवारांचं उत्तर
शरद पवार 2019 मध्ये पुण्यातून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा रंगली होती.

मुंबई : मी कुठलीही निवडणूक लढवणार नाही, माझ्या नावाची चर्चा करु नका असा सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. लोकसभा निवडणूक 2019 च्या तयारीसाठी जागांच्या आढावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक सुरु आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होत आहे. "शरद पवारांनी 2014 मध्येत कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र हे तर्क वितर्क कुठू आले, कोणी या बातम्या पसरवल्या हे आम्हाला माहित नाही. आज पवारांनी स्पष्ट सांगितलं की, ते जनतेमधून कोणतीही निवडणूक लढवणार नाही," असं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. निवडणुकीसाठी शरद पवारांची चर्चा शरद पवार 2019 मध्ये पुण्यातून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा रंगली होती. आघाडीत पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत सुरेश कलमाडी यांनी पुण्याचा गड राखला होता. पण राष्ट्रकुल क्रीड स्पर्धेतील भ्रष्टाचार आरोपानंतर पुणे लोकसभा मतदारसंघातून विश्वजित कदम यांनी निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. विश्वजित कदम हे आता कडेगाव-पलूसचे आमदार आहेत. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीने काँग्रेसकडे मागितल्याची माहिती आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही तर भाजप सोडून इतर सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्यासाठी शरद पवार हे नेतृत्व करु शकतात. अशा वेळी राज्यसभेऐवजी निवडणूक लढवून लोकसभेत असणं पवारांसाठी आवश्यक आहे. त्यामुळे ही रणनिती असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शरद पवार पुण्यातून निवडणूक लढवण्याबाबतच्या शक्यतांवर चर्चा झाली. मात्र मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही, माझा नावाची चर्चा करु नका, अशा आदेशच पवारांनी दिला आहे. राष्ट्रवादीची राज्यात 25 जागांची मागणी सूत्रांच्या माहितीनुसार राज्यातील 48 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसकडे 25 जागांची मागणी केली आहे. त्यातली एक जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादी आपल्या कोट्यातून देण्यास तयार आहे. राष्ट्रवादीला काँग्रेसकडून काही जागा बदलून हव्या आहेत. तर 2019 ची निवडणूक महत्वाची असल्याने या निवडणुकीत काहीही करुन दोन आकडी जागा जिंकण्याची जय्यत तयारी काँग्रेस करत आहे.
आणखी वाचा
























