प्रेमसंबंध मान्य नसल्याने वडिलांकडून मुलीची हत्या, नराधम पित्याला अटक
खोट्या प्रतिष्ठेसाठी बापानेच मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे.
ठाणे : वडिलांनीच मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. मुलीचं प्रेमप्रकरण मान्य नसल्याने वडिलांनी मुलीची हत्या केली. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात रविवारी पहाटे तरुणीचा अर्धवट मृतदेह एका बॅगेत सापडला होता. या गुन्ह्याच्या तपासात संबंधित तरुणीची हत्या तिच्या वडिलांनीच केल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी मृत मुलीच्या वडिलांना अटक केली आहे. अरविंद तिवारी (47) असं आरोपी पित्याचं नाव आहे.
अरविंद याची मोठी मुलगी प्रिन्सी (22) हिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र तिच्या वडिलांना ते मान्य नव्हते. या प्रेमप्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी अरविंदने प्रिन्सीला जीवे मारण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने प्रिन्सीला आधी बेशुद्ध केलं आणि त्यानंतर तिची हत्या केली. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून आणि पुरावा नष्ट करण्यासाठी अरविंदने आपल्या मुलीच्या मृतदेहाचे तुकडे केले. यातील कमरेखालचा मृतदेह बॅगेत भरुन 8 डिसेंबर रोजी टिटवाळ्याहून लोकलने कल्याणला आणला, तेथून भिवंडीला जाणारी रिक्षा पकडली. मात्र रिक्षाचालकाला अरविंद यांच्याकडे असलेल्या बॅगेतून वास आल्याने त्याला हटकलं. त्यानंतर अरविंदने बॅग तिथेच टाकून पळ काढला. बॅगेत तरुणीचा मृतदेह असल्याचं समोर आल्यावर घटनास्थळी मोठी खळबळ उडाली.
या हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक एमएफसी पोलिसांसह गुन्हे शाखेकडूनही सुरु होता. तपासात सीसीटीव्हीच्या आधारे बॅग ठेवलेला व्यक्ती टिटवाळ्याहून कल्याणला आल्याचं स्पष्ट झाल्याने पोलिसांनी टिटवाळा परिसरात तपास करत अरविंद याला अटक केली. ऑनर किलिंगच्या या घटनेमुळे ठाणे जिल्हा हादरला आहे. दरम्यान मृतदेहाचा अर्धा भागाता पोलीस शोध घेत आहेत.
मुंबईच्या मालाड येथे ट्रान्सपोर्टमध्ये काम करणाऱ्या अरविंद तिवारीला चार मुली आहेत. मृत प्रिन्सी ही मोठी मुलगी असून ती खाजगी कंपनीत नोकरीला होती. तिचे एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरु होते. याची माहिती अरविंदला मिळाल्यानंतर त्याने तिला वारंवार समजावले. मात्र प्रिन्सी ऐकायला तयार नव्हती. तिच्या प्रेमप्रकरणामुळे अन्य मुलींच्या जीवनावर परिणाम होईल म्हणून त्याने प्रिन्सीचा काटा काढण्याचे ठरवलं आणि तिची क्रूरपणे हत्या केली.