मुंबई महापालिकेच्या छतावर चढून फेरीवाल्यांची घोषणाबाजी
घाटकोपरच्या हिंगवाला मार्केटमधील 317 फेरीवाल्यांनी सत्ताधारी शिवसेना आणि राज्य सरकारविरोधात आंदोलन केलं. त्यावेळी एका आंदोलकाने लक्ष वेधण्यासाठी थेट बीएमसीचं छत गाठलं आणि घोषणाबाजी सुरू केली. या आंदोलकाने छतावरून उडी मारण्याचाही प्रयत्न केला.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आवाराबाहेर घाटकोपरमधील फेरीवाल्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराज फेरीवाला महासंघ यांच्याकडून हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी एका फेरीवाल्यानं महापालिकेच्या छतावर चढून आंदोलन केलं.
घाटकोपरच्या हिंगवाला मार्केटमधील 317 फेरीवाल्यांनी सत्ताधारी शिवसेना आणि राज्य सरकारविरोधात आंदोलन केलं. त्यावेळी एका आंदोलकाने लक्ष वेधण्यासाठी थेट बीएमसीचं छत गाठलं आणि घोषणाबाजी सुरू केली. या आंदोलकाने छतावरून उडी मारण्याचाही प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षकांनी वेळीच छतावर चढलेल्या आंदोलक फेरीवाल्याला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
फेरीवाल्यांनी अचानक हे आंदोलन केलं होतं. मुंबई महानगर पालिका प्रशासनाला या आंदोलनाची कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने आंदोलक थेट बीएमसीच्या छतापर्यंत पोहोचले. त्यामुळे महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांची मोठी तारांबळ उडाली.
महापालिकेच्या आवारात आंदोलन करणाऱ्या फेरीवाल्यांनी पुनर्वसन होईपर्यंत घाटकोपरच्या हिंगवाला मार्केटमध्येच व्यवसाय करण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. आंदोलननादरम्यान फेरीवाल्यांनी फडणवीस सरकार आणि बीएमसीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे महापालिका परिसरात आंदोलक फेरीवाल्यांसोबतच बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.























