दुकानात अडकलेल्यांची जेसीबीने सुटका करण्याची वेळ; ठेकेदाराचा नागरिकांच्या जीवाशी खेळ
Nalasopara News : गटाराचं काम करणाऱ्या ठेकेदारानं चक्क गटार खोदून ठेवल्यानं दुकानदाराला दुकानातच राहावं लागलं. जेसीबीच्या साहाय्याने दुकानातून बाहेर काढण्यात आलं.
नालासोपारा : वसई-विरार (Vasai-Virar) शहर महानगरपालिकेच्या ठेकेदाराची काम करण्याची पध्दत नागरिकांच्या जीवावर येवू शकते असा प्रकार समोर आला आहे. गटाराचं काम करणाऱ्या ठेकेदारानं दुकानासमोरील गटार खोदून ठेवल्यानं दुकानदाराला दुकानातच राहावं लागलं. त्याला जेसीबीच्या साहाय्याने राञी पावणे अकराच्या सुमारास दुकानातून बाहेर काढण्यात आलं. आपण दुकानदाराला अगोदरच सांगितल्याचं तेथील ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याने उर्मटपणे सांगितलं.
जेसीबीचा वापर करत सुटका
नालासोपारा (Nalasopara) पूर्वेच्या अल्कापूरी येथील साईधाम अपार्टमेंटमधील एक मोबाईलचं दुकान सुरु होतं. पालिकेचं गटाराचं काम सुरु असल्याने ठेकेदाराने दुकानासमोर चक्क दहा फुट खोदून ठेवलं, यामुळे दोन इसम या दुकानातच अडकले. त्यांना राञी पावणे अकराच्या सुमारास बाहेर काढण्यासाठी चक्क जेसीबीचा वापर करण्यात आला. दुकानातील दोन इसम जीवावर उदार होऊन जेसीबीच्या साहाय्याने घाबरत घाबरत बाहेर आले. यावेळी रात्रीच्या सुमारास बघणाऱ्या नागरिकांनी एकच कल्लोळ केला होता.
दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
सदर इमारत ही लोडबेरींग आहे. त्या इमारतीच्या अगदी पिलरच्या जवळून गटारासाठी खोदण्यात आलं आहे. त्यामुळे त्या इमारतीला ही धोका पोहचू शकतो. या कामावर पालिकेचं कोणतंही नियोजन आणि देखरेख नसल्याचं यावरुन जाणवत आहे. भविष्यात कोणतीही दुर्घटना घडली तर, याला जबाबदार कोण हा ही प्रश्नचिन्ह या निमित्ताने उपस्थित होतोयं. तेथील ठेकेदाराच्या कर्मचा-याने, आपण त्या दुकानदाराला आगोदर सांगितलं होतं. असं सांगून आपली पालिकेत बिनधास्त तक्रार करा असं उर्मटपणे सांगितलं.
ठेकेदार कर्मचाऱ्याचं उर्मट उत्तर
अशा धोकादायक पद्धतीने दुकानदाराला बाहेर काढल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका नाही का असं विचारलं असता, कामगाराने उत्तर देत म्हटलं आहे की, नाही कोसळणार. जेसीबी नाही तर काय हाताने काढलं असतं, त्यांच्या जीवाला धोका नाही. आम्ही त्यांना आधी बाहेर यायला सांगितलं होतं, असं उत्तर ठेकेदाराचा कर्मचारी लालू पवार याने उर्मटपणाने दिलं आहे.
नागरिकांच्या जीवाला धोका
हे काम अतिशय धोकादायक पद्धतीने करण्यात आलं. भिंत जर कोसळली असती नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. पण, कामगारांनी याकडे दुर्लक्ष केलं. याचं उत्तर विचारलं असता, तुम्ही नगरपालिकेकडे जाऊन तक्रार करा, असंही कामगार लालू पवार याने म्हटलं आहे. आता नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या ठेकेदार आणि कामगारांवर पालिका काय कारवाई करणार हे पाहावं लागेल.