Coronavirus update | मुंबईचा जीव भांड्यात, ब्रिटनच्या नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण नाही
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या मुंबईकर या विषाणूच्या संसर्गाशी दोन हात करताना दिसत आहेत. मुंबईमध्ये कोरोना रुग्ण नव्यानं आढळण्याचं प्रमाण कमी झालं आहे...
मुंबई : कोरोना व्हायरसच्या नव्या प्रकाराची अर्थाच नव्या स्ट्रेनची दहशत सध्या जगभरात पाहायला मिळत आहे. युकेमध्ये कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात साधारण वर्षभरापूर्वी जसं भीतीदायक वातावरण पाहायला मिळालं होतं, काहीसं तसंच चित्र आताही तिथं पाहायला मिळू लागलं आहे.
तिथं सुरु असणारं कोरोनाचं संकट पाहता भारतातही काही महत्त्वाची पावलं उचलली गेली. महाराष्ट्रातही अशीच परिस्थिती दिसून आली. कोरोनाचं हे नवं संकच राज्यात धडकण्यापूर्वीच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आणि त्याच धर्तीवर नियमांचं अधिक काटेकोरपणे पालन केलं गेलं.
तिथं देशात युकेहून परतलेल्या आणि प्रवासाचा संदर्भ असलेल्या काही प्रवाशांना कोरोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याचं वृत्त हाती आलं आणि तणावाच्या परिस्थितीत आणखी वाढ झाली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे- कल्याण, पुणे अशा ठिकाणी युकेहून आलेल्या प्रवाशांची संख्याही हजारांच्या घरात पोहोचली.
आरोग्य यंत्रणांनी तातडीनं अशा प्रवाशांना शोधून काढत त्यांच्या आरोग्याची माहिती, कोरोना चाचण्या, त्यांचे स्वॅब नमुने घेतले. यातून मुंबईच्या दृष्टीनं समोर आलेली मोठी दिलासादायक बाब म्हणजे युकेहून परतलेल्या प्रवाशांमध्ये 26 प्रवासी कोरोनाबाधित आढळले होते. त्यातून 14 जण कोरोना निगेटीव्ह होते. रुग्णांच्या या यादीतील कोणालाही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झालेली नाही ही मोठी बाबही अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केली. त्यामुळं काहीसा वेग पकडणाऱ्या या मायानगरीचा जीव भांड्यात पडला आहे.
मुंबईत कोरोनामुळं तीन मृत्यू; मार्चनंतर पहिल्यांदाच मृतांचा इतका कमी आकडा
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या मुंबईकर या विषाणूच्या संसर्गाशी दोन हात करताना दिसत आहेत. मुंबईमध्ये कोरोना रुग्ण नव्यानं आढळण्याचं प्रमाण कमी झालं आहे, शिवाय कोरोनामुळं मृत पावणाऱ्यांचा आकडाही कमी झाला आहे. आरोग्य यंत्रणांसाठी ही बाब अतिशय मोठा दिलासा देणारी ठरत आहे.