(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोना चाचणी 45 मिनिटात करण्यास सक्षम अशा 10 मशीन अडकल्या निविदा प्रक्रियेत
कोरोना व्हायरसचं कमी वेळेत निदान होणे ही सध्याची गरज आहे. मात्र भारतात कोरोनाची चाचणी होण्यासाठी बराच वेळ लागत आहे. अशा स्थितीत कोरोना चाचणी 45 मिनिटात करण्यास सक्षम अशा 10 मशीन निविदा प्रक्रियेत अडकल्या आहेत.
मुंबई : आज संपूर्ण देशात कोरोना संक्रमण झालेल्या नागरिकांची संख्या वाढत असून महाराष्ट्रात सुद्धा परिस्थिती बिकट होत चालली आहे. अशा वेळी कोरोनाची चाचणी घेत तात्काळ म्हणजे 45 मिनिटात परिणाम देणारी स्वयंचलित आरएनए शुद्धीकरण प्रणाली ( Automated RNA Purification System) मशीन ही निविदा प्रक्रियेत अडकली असून तात्काळ लक्ष देण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच संबंधित अधिकाऱ्यांस पाठविलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, संपूर्ण राज्यात अशा 10 स्वयंचलित आरएनए शुद्धीकरण प्रणाली ( Automated RNA Purification System) मशीन खरेदी करण्यासाठी हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळ ( मर्यादित) तर्फे 14 मार्च 2020 रोजी ई- निविदा जारी केल्या होत्या. ज्याचा निर्णय 27 मार्च 2020 रोजी घेण्यात येणार होता. 15 लाख एका मशीनसाठी अंदाज खर्च आहे आणि महाराष्ट्र राज्याला अशा 10 मशीनची आवश्यकता आहे.
एकावेळी 24 नागरिकांच्या चाचणी करण्याची क्षमता असलेल्या मशीन 45 मिनिटात अहवाल देण्यात सक्षम आहे. आज अहवाल तात्काळ न मिळाल्याने 2 ते 3 दिवस संपूर्ण यंत्रणा ताटकळत राहते आणि पॉझिटिव्ह असल्याची माहितीचा अहवाल वेळेत प्राप्त न झाल्यामुळे ताणही वाढतो. वैद्यकीय संचालनालयतर्फे तात्काळ निधी हाफकिनकडे वळवण्यात येणे आवश्यक असताना मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या लालफिताशाही म्हणो किंवा आणखी काही, निर्णय घेण्यास वेळखाऊ धोरण अवलंबले जात आहे, असा आरोप गलगली यांचा आहे.
किचकट प्रक्रिया आणि प्रतिक्षेत असलेल्या निविदा तत्काळ उघडत निर्णय घ्यावा जेणेकरुन या सर्व 10 स्वयंचलित आरएनए शुद्धीकरण प्रणाली ( Automated RNA Purification System) मशीनचा फायदा राज्यास होऊ शकतो, अशी मागणी सरतेशेवटी गलगली यांनी केली आहे.
संबधित बातम्या