एक्स्प्लोर
मुंबईतील अनेक परिसर कंटेनमेंट झोन, या झोनमध्ये कसं चालणार काम?
कोरोनोमुळे मुंबईत महाराष्ट्रतील सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे मुंबईतील काही क्षेत्रं 'कंटेनमेंट झोन' म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. 'कंटेनमेंट झोन' लगतच्या परिसरात परिस्थितीनुरुप गरजेचे वाटल्यास उर्वरित क्षेत्र बफर झोन म्हणून जाहीर करून त्यावर देखरेख ठेवली जात आहे.

ईस्टर्न फ्रीवे क्वचितच असा दिसून येतो.
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात सर्वात जास्त रुग्ण मुंबईमध्ये आढळून आले आहेत. यामुळे प्रशासनाने सतर्कतेचे पाऊल उचलले आहे. मुंबईमध्ये ज्या ठिकाणी बाधित रुग्ण आढळलेला आहे, अशा ठिकाणापासूनआणि परिस्थितीनुरूप ठराविक परिघातील क्षेत्र हे बाधित क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येत आहे. हे क्षेत्र 'कंटेनमेंट झोन' म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. 'कंटेनमेंट झोन' लगतच्या परिसरात परिस्थितीनुरुप गरजेचे वाटल्यास उर्वरित क्षेत्र बफर झोन म्हणून जाहीर करून त्यावर देखरेख ठेवली जात आहे. ज्या इमारतीमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला आहे, अशी इमारत आणि त्या लगतची इमारत ही परिस्थितीनुरूप 'बाधित क्षेत्र' अर्थात 'कंटेनमेंट झोन' म्हणून जाहीर करण्यात आला आहे. अनेक इमारती असणाऱ्या एखाद्या मोठ्या सोसायटीमधील एका इमारतीत बाधित रुग्ण आढळून आला असल्यास, सदर संपूर्ण सोसायटी 'कंटेनमेंट झोन' म्हणून जाहीर करण्याची गरज नाही. तर त्या सोसायटीतील ज्या इमारती मध्ये बाधित रुग्ण आढळून आला असेल, ती इमारत 'कंटेनमेंट झोन' म्हणून जाहीर करण्याची पद्धती अवलंबण्यात येत आहे. त्याचबरोबर सदर ठिकाणची परिस्थिती लक्षात घेऊन त्या इमारती लगतच्या काही इमारती ह्या 'कंटेनमेंट झोन' मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला जात आहे. एक इमारत किंवा काही इमारती यांचा समावेश 'कंटेनमेंट झोन' मध्ये केल्यानंतर सदर परिसर बंदिस्त करण्यात येत असून सदर परिसरात प्रवेश बंदी लागू करण्यात येत आहे. तसेच अशा परिसरातील नागरिकांना लागणाऱ्या अत्यावश्यक सेवा सुविधा या इमारतीच्या किंवा परिसराच्या प्रवेशद्वारावर सशुल्क पद्धतीने देण्यात येत आहेत. अशा परिसराच्या लगतच्या इमारती या 'बफर झोन' म्हणून निर्धारित करण्याचा व देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय परिस्थितीनुरूप घेतला जात आहे. 'बफर झोन' परिसरात केवळ अत्यावश्यक सेवांसाठी हीच मर्यादित प्रवेश देता येऊ शकेल. कंटेनमेंट झोनमध्ये काय केली जातेय कार्यवाही • जे क्षेत्र 'कंटेनमेंट झोन' म्हणून जाहीर झाले आहेत, त्या क्षेत्रातील महत्त्वाच्या व दर्शनीय जागी ठळक अक्षरात सूचना फलक लावण्यात येत आहे. • प्रत्येक 'कंटेनमेंट झोन'च्या व्यवस्थापनासाठी एक 'कंटेनमेंट ऑफिसर' नेमण्यात आला आहे. तसेच त्यांच्या सोबतीला आवश्यक ते कर्मचारी व पोलिस यांचा समावेश असलेले पथक कार्यरत आहे. • 'कंटेनमेंट झोन' परिसरातील बाधित रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य व संपर्कातील नजीकच्या व्यक्ती यांची 'हाय रिस्क' आणि 'लो रिस्क' अशा दोन गटात विभागणी करण्यात येत आहे. या दोन्ही गटातील व्यक्तींना विभागीय स्तरावर अधिग्रहित करून तयार करण्यात आलेल्या विलीनकरण सुविधेमध्ये स्थलांतरित करण्यात येत आहे. तथापि हे विलगीकरण करताना इतरांना त्यांच्यापासून संसर्ग होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. • 'कंटेनमेंट झोन' मधील उर्वरीत लोकसंख्येसाठी पडताळणी व तपासणी शिबिरे आयोजित करून त्यामध्ये लक्षणे आढळलेल्या व्यक्तिंवर देखील वैद्यकीय उपचारक्रमानुसार उपचार करण्यात येत आहेत. • या कंटेनमेंट घेऊन परिसरात असणारी दवाखाने किंवा रुग्णालये इत्यादी ठिकाणी येणाऱ्या रुग्णांपैकी फ्लू सदृश आजाराच्या रुग्णांची दैनंदिन माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याकडे नियमितपणे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. • बाधित व्यक्तीच्या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या व्यक्तींना महापालिकेने ताब्यात घेतलेल्या हॉटेल्स, लॉज, वसतिगृहे इत्यादी ठिकाणी स्थलांतरित करण्याची कार्यवाही परिस्थितीसापेक्ष व गरजेनुसार करण्यात येत आहे. • स्थलांतरित करण्यात आलेल्या व्यक्तिंच्या खानपानाचे व वैद्यकीय सेवा सुविधेचे व्यवस्थापन हे महापालिकेच्या विभाग स्तरावरून नियमितपणे करण्यात येत आहे. • कोणत्या 'कंटेनमेंट झोन' मधील किती लोकांना, कुठे स्थलांतरित करण्यात आले आहे? या बाबतची माहिती नियमितपणे अद्ययावत करण्यात येत आहे. • 'कंटेनमेंट झोन' मधील इमारती व त्यातील निवासस्थान यांना नियमितपणे भेट देऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याचबरोबर या झोन मधील लोकसंख्येचे रोजच्या रोज सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले असून हे काम सलग 14 दिवस करावयाचे आहे. • सर्वेक्षणासाठी आवश्यक तेवढ्या पथकांची निर्मिती करून प्रत्येक पथकात एक वैद्यकीय अधिकारी समाविष्ट करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत. या सर्वेक्षणात दरम्यान ज्या व्यक्तींमध्ये फ्लू सदृश आजाराची लक्षणे आढळून येतील त्यांच्यावर वैद्यकीय उपचार क्रमानुसार उपचार करण्याचीकार्यवाही करण्यात येत आहे. • 'कंटेनमेंट झोन' परिसरातील नागरिकांसाठी प्रभावी आरोग्य शिक्षण मोहीम नियमितपणे राबविण्यात येत आहे. • 'कंटेनमेंट झोन' परिसरातील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजांच्या वस्तू सशुल्क पद्धतीने देण्याचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. यासाठी पोलिसांसह गॅस एजन्सी, दूध पुरवठादार, अन्नधान्य-भाजीपाला विक्रेते इत्यादींची मदत घेतली जात आहे.
आणखी वाचा























