Corona Vaccine | ठाण्यात आतापर्यंत 1 लाखाहून अधिक नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण
ठाण्यात 1 लाख 24 हजार 827 नागरिकांना लस देण्यात आली आहे. यामध्ये महापालिका केंद्रात 1 लाख 2 हजार 884 तर खाजगी हॉस्पिटलमध्ये 21 हजार 943 नागरिकांना लस देण्यात आली आहे.
ठाणे : ठाण्यात आतापर्यंत 1 लाख 24 हजार 827 नागरिकांना ठाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्रात तसेच खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरात व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ .विपिन शर्मा यांनी दिली. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड व कोवॅक्सिन लसीचा डोस शासनाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार टप्या टप्प्याने देण्याचे काम महापालिका प्रशासनाच्यावतीने सुरू आहे.
या मोहिमे अंतर्गत पहिल्या टप्प्यात कोरोनाबाधित रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सला लस देण्यात आली. तर सद्यस्थितीत ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना लस देण्यात येत आहे. आता पर्यंत ठाण्यात 1 लाख 24 हजार 827 नागरिकांना लस देण्यात आली आहे. यामध्ये महापालिका केंद्रात 1 लाख 2 हजार 884 तर खाजगी हॉस्पिटलमध्ये 21 हजार 943 नागरिकांना लस देण्यात आली आहे. 60 वर्षावरील 59 हजार 892 नागरिकांना 55 हजार118 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाइन कर्मचारी तसेच 45 ते 60 वयोगटातील 9817 नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी दिली.
लसीकरण केंद्रामध्ये महापालिकेच्या ठाणे ग्लोबल इम्पॅक्ट हब, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, पोस्ट कोव्हीड सेंटर, मेंटल हॉस्पिटल, कौसा हॉस्पिटल, हाजुरी, सह्याद्री, आंबेडकर भवन, वाडिया, किसननगर, रोसा गार्डेनिया,कौसा आरोग्य केंद्र, कोपरी मॅटर्निटी, अतकोनेश्वर आरोग्य केंद्र, आयुर्वेदिक हेल्थ सेंटर,आझाद नगर आरोग्य केंद्र, बाळकूम आरोग्य केंद्र, सी आर वाडिया आरोग्य केंद्र,रोसा गार्डेनिया, गांधी नगर, कळवा, किसन नगर, लक्ष्मी चिराग नगर आरोग्य केंद्र, लोकमान्य कोरेस आरोग्य केंद्र. माजिवडा आरोग्य केंद्र, मनोरमानगर, मानपाडा, नौपाडा, शीळ आरोग्य केंद्र, शिवाजीनगर आरोग्य केंद्र, उथळसर आरोग्य केंद्र, वर्तकनगर आरोग्य केंद्र, सावरकर नगर आरोग्य केंद्र आणि आनंदनगर आरोग्य केंद्र, काजूवाडी आरोग्य केंद्र, कौसा, कोरेस, कोपरी आरोग्य केंद्र, आपला दवाखाना आणि ढोकाळी आरोग्य केंद्र आदी ठिकाणांचा समावेश आहे.
तसेच खाजगी रूग्णालयांमध्ये सिद्धिविनायक रुग्णालय, सफायर, वेदांत हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, काळसेकर रुग्णालय,प्राइम होरायझन हॉस्पिटल, हायवे हॉस्पिटल, पिनॅकल ऑर्थोकेअर हॉस्पिटल, हायलँड हॉस्पिटल, ईशा नेत्रालय आणि कौशल्या रुग्णालय आदी रुग्णालयांचा समावेश आहे.