बुलेट ट्रेन नामंजूर, शिवसेनेकडून जागा हस्तांतरण प्रस्ताव दफ्तरी दाखल!
तब्बल चार वेळा ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी आणण्यात आलेला बुलेट ट्रेन जागा हस्तांतरण प्रस्ताव अखेर नामंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे भाजपच्या नगरसेवकांनीही या प्रस्तावाच्या बाबतीत मौन बाळगल्याचं दिसून आलं.
ठाणे : तब्बल चार वेळा ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी आणण्यात आलेला बुलेट ट्रेन जागा हस्तांतरण प्रस्ताव अखेर बुधवारी (23 डिसेंबर) झालेल्या सर्वसाधारण सभेत दफ्तरी दाखल करण्यात आला आहे. याचाच अर्थ तो नामंजूर करुन पुन्हा पाठवण्यात आला आहे. मुंबई कारशेडच्या जागेवरुन सध्या राज्य आणि केंद्रामध्ये राजकीय वातावरण तापत असताना ठाणे महापालिकेत सत्ताधारी असलेली शिवसेना आणि आता महाविकास आघाडीत घटक असलेली राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून या नामंजुरीचा प्रस्ताव आला पाठिंबा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या नगरसेवकांनी देखील यावेळी महासभेत मौनव्रत धारण केल्याने एक मताने हा प्रस्ताव मंजूर झाल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे.
कुठून जाते बुलेट ट्रेन? ठाणे महापालिका क्षेत्रातील शीळ, डवले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावातून बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार असून म्हातार्डी येथे बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जाणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एनएचएसआरसीएल) माध्यमातून प्रकल्पासाठी जागा हस्तांतराची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. या प्रकल्पात महापालिकेच्या मालकीची शिळ भागातील 3849 चौरस मीटर इतकी जागा बाधित होणार आहे. ही जागा प्रकल्पासाठी देण्याची मागणी एनएचएसआरसीएलने गेल्या वर्षी केली होती. तसेच या जागेच्या बद्दल्यात 6 कोटी 92 लाख 82 हजार रुपये मोबदला देण्याची तयारी दाखवली होती.
काय झाले महासभेत? याआधी तीन वेळा हा प्रस्ताव सभेत आला होता मात्र त्यावर निर्णय झाला नव्हता. बुधवारी हा प्रस्ताव मंजुरीसाठी येताच, वारंवार हा प्रस्ताव का आणला जात आहे, असा सवाल भाजपचे नगरसेवक संजय वाघुले यांनी उपस्थित केला. त्याला भाजपचे इतर नगरसेवक साथ देतील असे वाटत होते. मात्र इतर नगरसेवकांनी यावर कोणतीच भूमिका घेतली नाही. त्यामुळे एकप्रकारे त्यांच्या नगरसेवकांनी या प्रस्तावाच्या बाबतीत मौनच बाळगल्याचे दिसून आले. त्यामुळे महापौर नरेश म्हस्के यांनी हा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. त्यांच्या या निर्णयामुळे एक प्रकारे मोदी यांच्या स्वप्नांना सुरुंग लावण्याचे काम आणि मुंबई मेट्रोच्या कांजुरमार्ग येथील कारशेडचा वचपा काढण्याचे काम ठाण्यात शिवसेनेने केले आहे.
Bullet train Vs Metro train | ठाण्यातील बुलेट ट्रेनच्या प्रस्तावाला सत्ताधारी शिवसेनेचा विरोध