(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई महापालिकेच्या पार्किंग पॉलिसीत बदल, दंडांची रक्कम कमी करुन दिलासा देण्याचा प्रयत्न
रस्त्यांवरच्या बेकायदेशीर पार्किंगसाठी मुंबई महापालिकेने पार्किंग पॉलिसी लागू करत वाढीव दंड आकारण्यास सुरुवात केली होती. वाहनतळाबाहेर 500 मीटरच्या परिघात बेकायदेशीर वाहने उभी असल्यास आतापर्यंत 5 ते 23 हजारांपर्यंतच्या वाढीव दंडाची तरतूद होती.
मुंबई : सर्वच शहरांमध्ये पार्किंगची मोठी समस्या आहे. या समस्येवर उपाय म्हणून तिथल्या प्रशासनाने काही नियमावली तयारी केली आहे. मुंबई महापालिकेचीदेखील एक नियमावली तयार करण्यात आली होती. परंतु त्यामध्ये दंडांची रक्कम खूप मोठी असल्याने त्याला मोठा विरोध झाला. परिणामी महापालिकेला त्यामध्ये कपात करावी लागली आहे.
वाहनतळाबाहेर बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्यांना आता पार्किंगच्या दराच्या चाळीस पट दंड भरावा लागणार आहे. तर वर्दळीचे मार्ग असलेल्या एम.के. रोड, एस.व्ही. रोड, एलबीएस मार्ग, न्यू लिंक रोड या चार महत्त्वाच्या रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंगसाठी मोठा दंड आकारला जाईल.
यापूर्वी रस्त्यांवरच्या बेकायदेशीर पार्किंगसाठी महापालिकेने पार्किंग पॉलिसी लागू करत वाढीव दंड आकारण्यास सुरुवात केली होती. वाहनतळाबाहेर 500 मीटरच्या परिघात बेकायदेशीर वाहने उभी असल्यास आतापर्यंत 5 ते 23 हजारांपर्यंतच्या वाढीव दंडाची तरतूद होती. हे वाढीव दंड लागू केल्यामुळे पार्किंग पॉलिसीचा बराच विरोध झाला. मात्र, आता ही वाढीव दंडाची रक्कम काही अंशी कमी करण्याचा पालिकेनं प्रयत्न केला आहे. तर काही ठिकाणी वाहनतळात वाहनप्रकारानुसार पार्किंगसाठी निश्चित केलेल्या दराच्या चाळीस पट दंड आता आकारला जाणार आहे.
चार महत्वाचे रस्ते वगळता इतर मुंबईसाठीचे दर
आधीचा दंड आणि आताचा दंड (पार्किंग पॉलिसीतील नव्या नियमांनुसार) दुचाकी पूर्वीचा दंड - 5000 रुपये सुधारीत दंड - 1800 रुपये
तीन-चार चाकी वाहन पूर्वीचा दंड - 10,000 रुपये सुधारीत दंड - 4000 रुपये
ऑटो, टँक्सी पूर्वीचा दंड - 8000 रुपये सुधारीत दंड - 4000 रुपये
सार्वजनिक वाहतूक बस पूर्वीचा दंड - 11,000 रुपये सुधारित दर - 7000 रुपये
ट्रक/टेम्पो पूर्वीचा दंड - 15,000 रुपये सुधारित दर - 10,000 रुपये
एम.के. रोड, एस.व्ही. रोड, एलबीएस मार्ग, न्यू लिंक रोड या चार महत्वाच्या रस्त्यांसाठीचा दर
दुचाकी पूर्वीचा दंड - 5000 रुपये सुधारीत दंड - 3400 रुपये
तीन-चार चाकी वाहन पूर्वीचा दंड - 10,000 रुपये सुधारीत दंड - 8000 रुपये
ऑटो, टँक्सी पूर्वीचा दंड - 8000 रुपये सुधारीत दर - 4000 रुपये
सार्वजनिक वाहतूक बस पूर्वीचा दंड - 14,000 रुपये सुधारित दर - 7000 रुपये
ट्रक/टेम्पो पूर्वीचा दंड - 19,800 रुपये सुधारित दर - 10,000 रुपये