(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईतील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प, भांडूपमध्ये खासगी इमारतीवर 500 किलोवॅटचा प्रकल्प
सुमारे 1500 सोलर पॅनल्सच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या 500 किलोवॅटच्या या प्रकल्पातून सोसायटीला दिवसाला तब्बल 2 हजार युनिट्स मिळतात.
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात आलेल्या भरमसाट बिलांनी अनेकांना घाम फोडला. मात्र मुंबईतील काही गृहसंकुल सोसायटींना त्यानं अजिबात फरक पडलेला नाही, कारण त्यांनी आपली वीज स्वत: तयार करण्याची तयारी बरीच आधी करून ठेवलीय. मुंबईच्या भांडूप परिसरातील धीरज ड्रीम्स या रहिवासी संकुलावर बसवलाय मुंबईतील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प.
सुमारे 1500 सोलर पॅनल्सच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या 500 किलोवॅटच्या या प्रकल्पातून सोसायटीला दिवसाला तब्बल 2 हजार युनिट्स मिळतात. ज्यातनं सोसायटीच्या 16 लिफ्ट पॅसेजमधील दिवे, पाण्याचे पंप अहोरात्र सुरू असतात. नीट देखभाल केल्यास या प्रकल्पाचं आयुष्य 25 वर्षांपर्यंतचं असू शकत. तसेच याची देखरेख घरबसल्या मोबाईल अॅपच्या माध्यमातनं अगदी सहज होऊ शकते. मुंबईतील 'ऊर्जन' या कंपनीच्या माध्यमातून काही तरूण अभियांत्यांनी हा प्रकल्प इथं बसवलाय. ऊर्जनला त्यांच्या अभिनव कार्यक्षमतेमुळे केंद्र सरकारचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. आज देशभरातील 17 राज्यांत त्यांचे शेकडो सौरऊर्जा प्रकल्प कार्यरत आहेत.
भांडूपमधील हा प्रकल्प 20 मजली उंच इमारतीवर बसवला आहे. त्यामुळे तो ताशी 120 किमी. पर्यंतच्या वाऱ्याचा सहज मुकाबला करू शकतो. यंदा मुंबईच्या जवळून गेलेल्या 'निर्सग' चक्रीवादळात या सौरऊर्जा प्रकल्पाला धक्काही लागलेला नाही. त्यावरून याच्या मजबूतीचीही प्रचिता येते. इथं या सोलर सिस्टिमला बसवण्यासाठी या सोसायटीला 2 कोटींच्या घरात खर्च असला तरी गेल्या दिड वर्षात सोसायटीच्या मासिक विजबिलात 70 टक्के बचत होत आहे. त्यामुळे पुढील वर्षभरात सारा खर्च वसूल होईल आणि त्यानंतर सोसायटीला निव्वळ नफाच होईल असा कंपनीचा दावा आहे. त्यामुळे कोणताही कर न देता मोफत मिळणा-या या सौरऊर्जेचा वापर करून वीज बिलांत बचत करण्यासाठी गरज आहे ती अश्या जास्तीत जास्त प्रकल्पांना वास्तवात वापरण्याची.