(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Best Bakery Case : दोन आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका, मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय
Best Bakery Case : गुजरातमधील बेस्ट बेकरी प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल या दोन आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
Best Bakery Case : गुजरातमधील (Gujarat) बेस्ट बेकरी प्रकरणात (Best Bakery Case) मुंबई सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. सत्र न्यायालयाने हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल या दोन आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल हे गेल्या दहा वर्षांपासून कारागृहात आहेत. 13 डिसेंबर 2013 त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं होतं.
हे प्रकरण 21 वर्षांपूर्वीचं असून गुजरातमधील 2002 च्या दंगलीशी संबंधित आहे. साल 2002 मध्ये गुजरातमधील गोध्रा प्रकरणानंतर उसळलेल्या हिंसाचारातील एक गाजलेलं प्रकरण म्हणजे बेस्ट बेकरी हत्याकांड होतं. या घटनेत जमावाने 14 जणांना अतिशय निर्घृणपणे ठार मारलं होतं. जमावाने बेकरी जाळण्यापूर्वी तिथे लूटमार देखील केली होती.
काय आहे प्रकरण?
गोध्रा घटनेनंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीत वडोदरा येथील बेस्ट बेकरी जमावाच्या हल्ल्यात जाळून टाकण्यात आली होती. ज्यात 14 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बेकरी मालकाची मुलगी झहिरा शेख हिच्या तक्रारीवरुन 21 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. याप्रकरणी साल 2003 मध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाने सर्व आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्ताता केली होती. या खटल्यात झहिरा शेखसह अनेक साक्षीदारांना कोर्टाने फितूर घोषित केलं होतं. पुढे सत्र न्यायालयाचा हा निकाल गुजरात हायकोर्टानेही कायम ठेवला होता.
त्यानंतर सामाजिक कार्यकर्ता तिस्ता सेटलवाड यांच्या मदतीने झहिराने या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी पुन्हा खटला चालवण्याचे निर्देश देत हे प्रकरण गुजरातबाहरे चालवण्याचे निर्देश देत ते मुंबईत वर्ग केलं होतं.
कोण आहेत हे दोन आरोपी?
दरम्यानच्या काळात वडोदरा कोर्टाने फरार घोषित केलेल्या हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल यांच्यासह अन्य दोघांना तपास यंत्रणेने अजमेर ब्लास्ट प्रकरणी अटक केली. मुंबईत चालवलेल्या खटल्यात या दोन्ही आरोपींना फरार म्हणून घोषित करण्यात आलं होतं. मुंबई कोर्टाने याप्रकरणी 21 पैकी 9 जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तर आठ आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. हा निकाल येईपर्यंत अनेक आरोपींचा मृत्यू झालेला होता. 2012 मध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेल्या नऊ जणांपैकी पाच जणांची सुटका केली. तर 2013 मध्ये अटक केलेल्या चारपैकी दोन आरोपींचा मृत्यू झाला. उर्वरित दोघे हर्षद रावजीभाई सोलंकी आणि मफत मणिलाल गोहिल हे 10 वर्षांपासून तुरुंगात होते. आज सत्र न्यायालयाने या दोघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.