नाणार प्रकल्प कराराचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत
नाणार प्रकरणावरुन शिवसेना-भाजप यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. आज मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत नाणार प्रकल्पाचे पडसाद उमटले.
मुंबई : नाणार प्रकरणावरुन शिवसेना-भाजप यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. आज मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत नाणार प्रकल्पाचे पडसाद उमटले. मंत्रिमंडळाच्या या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी नाणार प्रकल्पाबाबत निषेध नोंदवला.
नाणार प्रकल्पाबाबत झालेल्या कराराविषयी विश्वासात घेतलं नसल्याची तक्रारही शिवसेनेच्या मंत्र्यांनी केली. शिवसेनेचा नाणार प्रकल्पाविरोधातील आक्रमक पवित्रा पाहून उद्या उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत बैठक घेणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेना मंत्र्यांनी दिलं आहे.
मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि देशातील बड्या उद्योगपतींची बैठक राजभवनात पार पडली. या बैठकीला राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना डावलण्यात आलं होतं. यामुळेच शिवसेनेने आज आक्रमक पवित्रा घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नाणार प्रकल्पावरून शिवसेना-भाजप यांच्यातील तणाव कमी होणार की वाढणार हे उद्याच्या बैठकीनंतर स्पष्ट होईल.