Antilia Explosives Scare | मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं असलेल्या स्कॉर्पिओ कारचं रहस्य कायम
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं असलेल्या स्कॉर्पिओ कोणाची होती? कुठून आली होती? त्या गाडीचा वापर कधी आणि कोणी केला या सर्वांत संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र स्कॉर्पिओ गाडीचं रहस्य सुटण्याऐवजी आणखीच किचकट होत चाललं आहे.
मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारी रोजी स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ गाडी उभी करण्यात आल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. ही स्कॉर्पिओ कोणाची होती? कुठून आली होती? त्या गाडीचा वापर कधी आणि कोणी केला या सर्वांत संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले.
मात्र स्कॉर्पिओ गाडीचं रहस्य सुटण्याऐवजी आणखीच किचकट होत चाललं आहे. स्कॉर्पिओ गाडी संदर्भात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. ही स्कॉर्पिओ गाडी सहा महीने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी वापरल्याचं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं. तसंच गाडीचे मूळ मालक सॅम नावाची व्यक्ती असून मनसुख हिरण आणि सचिन वाझे यांची आधीपासूनच ओळख असल्याचं सांगितलं.
नेमकं कसं आहे गाडीचे रहस्य आणि कोणते प्रश्न निर्माण होतात?
- स्कॉर्पिओ गाडीचे खरे मालक सॅम न्यूटन नावाची व्यक्ती आहे.
- गाडीच्या रिपेअरिंगचं काम करण्यासाठी सॅम न्यूटन यांनी गाडी मनसुख हिरण यांना दिली होती.
- मात्र 2018 मध्ये गाडीच्या रिपेअरिंगचं बिल 1 लाख 75 हजार रुपये बिल झालं, जे सॅम न्यूटन यांनी दिलं नाही. त्यामुळे मनसुख यांनी ती स्कॉर्पिओ स्वत:कडेच ठेवून घेतली.
- क्राईम ब्रान्चला दिलेल्या जबाबात मनसुख यांनी सांगितलं होतं की, 7 फेब्रुवारी रोजी मनसुख मुंबईला येत होते, मात्र त्यांच्या गाडीचे स्टेअरिंग लॉक झालं आणि गाडी हायवेलाच त्यांनी उभी केली.
- मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा गाडी घेण्यासाठी तिथे गेलो तेव्हा गाडी तिथे नव्हते, असं मनसुख यांनी सांगितलं.
- आता प्रश्न असा उपस्थित होतोय की मनसुख हिरण यांनी त्याच वेळेला मेकॅनिक बोलून त्यांची गाडी रिपेअर का करुन घेतली नाही.
- तर मनसुख हिरण यांच्या पत्नीने ही गाडी गेल्या चार महिन्यांपासून सचिन वाझे वापरत होते असा आरोप केला, जे सचिन वाझे यांनी फेटाळले आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गाडी जिथे उभी होती तिथून दोन तासांनंतर म्हणजे नऊच्या सुमारास ही गाडी कांजुर मार्ग इथून यूटर्न येऊन मुलूंड टोलनाका क्रॉस करताना दिसली आणि दुसऱ्याच दिवशी मनसुख यांनी स्वत: गाडी हरवल्याची तक्रार दिली.
त्यामुळे 7 फेब्रुवारीपासून 25 फेब्रुवारीपर्यंत ही गाडी कुठे होती? कोणी वापरली? आणि 25 फेब्रुवारी रोजी मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर हे गाडी आणून कोणी ठेवली? हे काही विचार करणारे प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्कॉर्पिओ आणि इनोव्हा गाडीचं रहस्य उलगडून या प्रकरणाचा तपास आता एनआयएला करायचा आहे, ज्याची सुरुवात एनआयएने केली असून लवकरच याचा छडा लागण्याची शक्यता आहे.