मध्यरात्री गुन्हा दाखल, भर दुपारी पत्रकार परिषद; आदित्य ठाकरेंचा सरकारवर गंभीर आरोप
मुंबईकरांसाठी लढत असताना गुन्हा दाखल होत असेल तर माझ्या आजोबांना अभिमान वाटत असेल, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली आहे.
![मध्यरात्री गुन्हा दाखल, भर दुपारी पत्रकार परिषद; आदित्य ठाकरेंचा सरकारवर गंभीर आरोप Aaditya Thackeray First Reaction After Fir registered Against Him lower Parel Bridge Mumbai Maharashtra News मध्यरात्री गुन्हा दाखल, भर दुपारी पत्रकार परिषद; आदित्य ठाकरेंचा सरकारवर गंभीर आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/18/323d15976315eda200eb4d63bae8561c170030142653089_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : आम्ही लोकांसाठी लढतोय म्हणून गुन्हे दाखल केले, असा आरोप ठाकरे गटाचे वरळीचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केलाय. तसंच दोन्ही पालकमंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान डिलाईल रोड उड्डाणपुलाचं बेकायदेशीररित्या उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यासह सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल (FIR against Aaditya Thackeray) करण्यात आला आहे. त्यावर आदित्य ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली.
आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईकरांसाठी लढतोय म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. उद्घाटनासाठी वेळ नसल्यामुळे डिलाईरोडचा पुल बंद ठेवण्यात आला होता. मुंबईकरांसाठी लढत असताना गुन्हा दाखल होत असेल तर माझ्या आजोबांना अभिमान वाटत असेल. बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्या बिल्डरवर गुन्हे दाखल होत नाहीत. वेळेत काम पूर्ण न केलेल्यांवर गुन्हे दाखल करा. भ्रष्टाचार आम्ही समोर आणले. पालकमंत्र्यांचा राजीनामा घ्या. स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा आम्ही समोर आणल्यानंतरही 22 कोटींचे कॉन्ट्रॅक्ट देण्याचा घाट घातला. मुख्यमंत्र्यांचे काहीच दिवस राहिले आहेत त्यामुळे राज्यपालांनी लक्ष घालावे.
मुख्यमंत्र्यांना समज द्यावी
नवी मुंबई मेट्रो पाच महिन्यांपासून तयार असून सुरु केली नव्हती. सरकारी कर्मचाऱ्यांचे दिवाळीचा बोनसचा प्रश्न उपस्थित केल्यावर बोनस दिला गेला. मुख्यमंत्र्यांना समज द्यावी अशी राज्यपालांना पत्राद्वारे मागणी केली आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी रस्ते ब्लॉक केले जातात. एकीकडे भाजप सांगतं व्हीआयपी कल्चर नको आणि दुसरीकडे रस्ते बंद करतात. आम्हाला जर म्हणत असतील की आम्ही पूल सुरू केल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला. मग समृद्धी महामार्ग उद्घाटन केलं त्यानंतर जे अपघात झाले, लोकांचा मृत्यू झाला मग आता गुन्हा कोणावर दाखल करायचा? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
डिलाई रोड ब्रिजच्या लेनचे उद्घाटन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
डिलाई रोड ब्रिजच्या लेनचे (Delisle Bridge Lower Parel) उद्घाटन केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंसह (Aditya Thackeray) पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल (FIR against Aaditya Thackeray) करण्यात आला आहे. एन एम जोशी पोलीस स्टेशन येथे मुंबई महापालिकेच्या रोड डिपार्टमेंटकडून तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आाला आहे. गुरूवारी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात बेकायदेशीररित्या आणि शासकीय कामात अडथळा आणून डीलाई रोडच्या दुसऱ्या लेनचे काम अपूर्ण असताना उद्घाटन करण्यात आले. डिलाई रोडवर इतर कामे अपूर्ण असताना आणि साधारणपणे सात दिवसानंतर या ब्रिजचं काम पूर्ण करून लेन सुरू करण्याचे नियोजन मुंबई महापालिकेने केलेले होतं. असं असताना अशाप्रकारे उद्घाटन करणे बेकायदेशीर असल्याचं मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. महापालिकेच्या नियोजित उद्घाटनापूर्वीच आदित्य ठाकरेंनी या पुलाचं उद्घाटन करून त्यावरून वाहतूक सुरू केली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)