(Source: Poll of Polls)
Vidarbha Weather Update : बकऱ्यांचा कळपावर वीज पडून 22 बकऱ्यांचा जागीच मृत्यू; विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची एकच दाणादाण
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज यवतमाळ जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. दरम्यान, एका शेतकऱ्याच्या बकऱ्यांच्या काळापावर अचानक वीज पडून यात 22 बकऱ्यांचा जागीच मृत्यू झालाय.
Vidarbha Weather Update : यवतमाळच्या (Yavatmal) उमरखेड तालुक्यातील चुरमुरा शेत शिवारातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या (IMD) अंदाजानुसार आज जिल्ह्यात सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, एका शेतकऱ्याने शेतात झाडाच्या खाली उभ्या केलेल्या बकऱ्यांच्या काळापावर अचानक वीज पडून यात 22 बकऱ्यांचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात सकाळपासूनच अनेक भागात ढगाळी वातावरण होते. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह रिमझिम पावसाने हजेरी लावली. अशातच जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील चुरमुरा शेत शिवारात वीज कोसळून या बकऱ्यांचा क्षणातच मृत्यू झाला आहे. या मृत झालेल्या बकऱ्या गावातीलच 17 नागरिकांच्या असून यात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
बकऱ्यांचा कळपावर वीज पडून 22 बकऱ्यांचा जागीच मृत्यू
गेल्या कित्येक दिवसांपासून वाढलेले तापमान आणि उकड्यामुळे पुरते हैराण झालेल्या वैदर्भीयांना आता दमदार पावसाची आतुरता लागली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मान्सूननं (Monsoon) राज्यासह विदर्भापर्यंत (Vidarbha) मजल मारली असल्याची घोषणा हवामान विभागाकडून करण्यात आली आहे. मात्र अद्याप विदर्भात दमदार पावसाची प्रतिक्षाच असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, उष्णतेचा पारा सरासरीपेक्षा वरच असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे. राज्यात बहुतांश भागात पावसाने दमदार एंट्री केली असली तरी विदर्भात अद्याप पावसाने दांडी दिल्याने नेमका पाऊस गेला तरी कुठे? असा प्रश्न या निमित्याने विदर्भवासियांना पडला आहे.
तर दुसरीकडे शेतीतीत पेरणीसाठी बळीराजा आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहे. अशातच नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने (Monsoon Arrived in Vidarbha) आज पासून पुढील पाच दिवस विदर्भाला यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या आठवड्यात तरी पाऊस हजेरी लावतो का? या कडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे.
भंडाऱ्यात वीज पडून दोन बैलांचा मृत्यू
भंडारा जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास ढग दाटून आले आणि जोरदार पावसानं हजेरी लावली. मोहाडी तालुक्यातील आंधळगाव, तुमसर तालुक्यातील गराबघेडा आणि लाखांदूर तालुक्यातील विरली या परिसरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं. तर, तुमसर तालुक्यातील गराबघेडा येथे वीज कोसळून दोन बैलांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी बरसल्यात. जोरदार पावसाच्या हजेरीनं वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली आहे.
वर्ध्यात पावसाने मारली दांडी, पेरण्या लांबल्याने शेतकरी चिंतेत
अर्धा जून महिना निघून गेला तरी वर्धा जिल्ह्यात मृग नक्षत्रात पाऊस बरसला नाही. शेतकरी मृग नक्षत्रात पावसाची प्रतीक्षा करतो आणि लगबगीने पेरणी देखील उरकवीत असतो. पण दहा दिवस लोटले असतानाही पाहिजे तसा पाऊस झाला नाही. तर काही शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली आहे. तर काहींच्या पेरण्या पावसाअभावी थांबल्या आहे. परिणामी, शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. पेरण्या लांबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावर्षी खरीप हंगामात चांगला पाऊस होईल अशी अपेक्षा ठेऊन असणारा शेतकरी वर्धा जिल्ह्यात पावसाची अद्याप प्रतीक्षाच करतो आहे.
इतर महत्वाच्या बातम्या