Amravati News : गेल्या सात दिवसांपासून दोन शेतकरी मुलींचे आमरण उपोषण सुरूच; आंदोलनकर्त्यां मुलींची प्रकृती खालावली
Amravati : आपल्या मागण्यासाठी दोन शेतकरी भगीणींने गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मात्र, आज सात दिवस उलटूनही या आंदोलनकर्त्यां मुलींची प्रशासनानं साधी दखल देखील घेतलेली नाही.
Amravati News अमरावती : वन्य प्राण्यांनी नुकसान केलेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी, तसेच खोटे पंचनामे करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर निलंबणाची कारवाई करावी, यासाठी दोन शेतकरी भगीणींने गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषणाला (Hunger Strike) सुरुवात केली आहे. मात्र, आज सात दिवस उलटूनही या आंदोलनकर्त्यां मुलींची प्रशासनानं साधी दखल देखील घेतलेली नाही. परिणामी आपल्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा या शेतकरी भगीणींने दिला आहे.
यासाठी जिल्ह्यातील अनेक संघटनांनी या आंदोलनाला पाठींबा घोषीत केलाय. मात्र 7 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या या मुलीची प्रकृती खालावली आहे. तर दुसरीकडे उद्या, 18 जून मंगळवारला अनेक संघटना रस्त्यावर उतरून या तरुणींच्या समर्थनार्थ रास्तारोको करणार असल्याचा इशाराही काही संघटनांनी दिला आहे.
सात दिवस उलटूनही आमरण उपोषण सुरूच
अमरावती वरुड तालुक्यातील पुसला येथील अनेक कृषि पुरस्कार प्राप्त दोन शेतकरी मुली गेल्या 10 जूनपासुन तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसल्या आहेत. दरम्यान उपोषणकर्त्या शेतकरी मुलींची प्रकृती दिवसागणिक खलावत चालली आहे. दरम्यान 15 तारखेला मध्यरात्री 3 वाजता भर पावसात त्या भिजुन कुडकुडत आमरण उपोषण करीत होत्या. मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणतीच खबरदारी घेतल्या गेली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. सुशिला बिडकर आणि बेबी बिडकर असे या दोन शेतकरी बहीणींचे नाव आहे. त्यांची शेती जंगलालगत असल्याने शेतातील पिकांचे वन्यप्राण्यांनी प्रचंड नुकसान केले. त्यानंतर प्रशासनाने या नुकसानीचा पंचनामा केला. मात्र 17 ऑक्टोबर रोजी केलेल्या मूळ पंचनाम्यानुसार नुकसान भरपाई मिळालेली नाही.
आंदोलनकर्त्यां मुलींची प्रकृती खालावली
तसेच मूळ पंचनामा बदलून नुकसानीची रक्कम कमी करून खोटा पंचनामा तयार केला. त्यावर कृषि सहाय्यक आणि आमच्या खोट्या सह्याही केल्या. तो खोटा पंचनामा तयार करून खोट्या सह्या करणाऱ्या संबंधित दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी. सोबतच आजपर्यंत न्याय मिळविण्यासाठी झालेल्या खर्चाची पूर्ण रक्कम द्यावी, या मागणीसाठी गेल्या 10 जूनपासून वरुड तहसील कार्यालयासमोर त्यांनी आमरण उपोषण प्रारंभ केला आहे. आता या आंदोलनाला अनेक संघटना आणि पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असून पाठिंबा घोषीत केलाल. तर उद्या मंगळवारी जिल्ह्यातील मुख्य रस्त्यांवर रास्तारोको आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. मात्र प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे दोन शेतकरी तरुणींना रस्त्यावर उतरून अशा पद्धतीने आंदोलन करावे लागत असल्याने समाजातून प्रशासना विरुद्ध रोष उमटताना दिसत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या