एक्स्प्लोर
किल्ले शिवनेरीवर मद्यपान करणारे फॉरेस्ट गार्ड निलंबित
मुख्य वन संरक्षक विवेक खांडेकर यांनी याबाबत माहिती दिली.

A
मुंबई/पुणे : शिवनेरी किल्ल्यावर मद्यपान करणाऱ्या दोन फॉरेस्ट गार्डचं निलंबन करण्यात आलं आहे. मद्यपान करणारे फॉरेस्ट गार्ड प्रकाश जाधव आणि संतोष नवगिर्हे यांना निलंबित केल्याची माहिती मुख्य वन संरक्षक विवेक खांडेकर यांनी दिली. शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती महोत्सव साजरा होत असताना काल रात्री वनविभागाचे तीन ते चार कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत आढळले. महोत्सवासाठी आलेल्या शिवप्रेमींनी या कर्मचाऱ्यांची पोलिसांकडे तक्रार केली. जुन्नर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत पाच जणांना अटक केली आहे. खरं तर कोणत्याही किल्ल्यावर मद्यसेवनाच्या घटना घडू नयेत म्हणून वनविभागाने नजर ठेवणं गरजेचं असतं, मात्र तेच मद्यसेवन करून नियमाची पायमल्ली करत असल्याचं दिसून आलं. यामुळे शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. सातारा जिल्ह्यातून आलेल्या शिवप्रेमींनी हा प्रकार उघडकीस आणला. पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहोचल्यानंतर चौकशी करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. पोलिसांनी सुरुवातीला माध्यमांना प्रकरणाची माहिती देण्यास नकार दिला, मात्र व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्व परिस्थिती समोर आली. त्यामुळे आता गुन्हा दाखल करत पाच जणांना अटक करण्यात आली. तर दोन जणांचं निलंबनही करण्यात आलं. गडावर धुम्रपान करू नये, अशा सूचनांचे फलक वन विभागानेच गडाच्या परिसरात लावले आहेत. मात्र त्यांच्या कर्मचाऱ्यांकडूनच या नियमाची पायमल्ली केली गेल्याचं, या व्हिडीओवरून समोर आलं. शिवप्रेमींनी घडला प्रकार जुन्नर पोलिसांपर्यंत पोहोचवला खरा, मात्र पोलिस निरीक्षक कैलास घोडके यांनी गडावर बंदोबस्तात व्यस्त असल्याचं सुरुवातीला कारण पुढं केलं आणि जुजबी माहिती दिली. अखेर चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हिडीओ :
आणखी वाचा























