शेट्टी म्हणाले आरोपांना भीक घालत नाही, तर तुपकर म्हणाले, डीपॉजिट जप्त झालेल्यांना गांभीर्यानं घेत नाही, राजू शेट्टी आणि तुपकर यांच्यात का बिनसलं?
Raju Shetti on Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांच्या किरकोळ आरोपांना मी भीक घालत नसल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
Raju Shetti on Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatna) संस्थापक राजू शेट्टी (Raju Shetti) आणि संघटनेचे माजी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्यात पुन्हा एकदा जुंपल्याचे पाहायला मिळाले आहे. रविकांत तुपकरांच्या किरकोळ आरोपांना मी भीक घालत नसल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. तुपकरांनी केलेल्या आरोपांना माझे कार्यकर्ते उत्तर देतील, असं राजू शेट्टींनी म्हटलं आहे.
तुमच्या दोघात कसे काय बिनसले? राजू शेट्टी म्हणाले...
राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्यात राजकीय मतभेद वाढले आहेत. लोकसभेची उमेदवारी आणि त्यातून चालणारे पक्षाचे राजकारण या विषयावरून दोघांमधील अंतर आणखी वाढल्याचे पाहायला मिळाले. नुकतीच राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून रविकांत तुपकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, राजू शेट्टींवर तुपकरांनी अनेक गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. मात्र, शेट्टींनी तुपकरांच्या या आरोपांवर अद्याप उत्तर दिले नव्हते. मात्र, राजू शेट्टी सध्या बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मी अशा किरकोळ आरोपांना भीक घालत नाही, माझे कार्यकर्ते उत्तर देतील असे राजू शेट्टींनी म्हटलं आहे. तुमच्या दोघात कसे काय बिनसले? त्याचे कारण काय? असा सवाल विचारला असता तुम्ही तुपकरांनाच विचारा असेही राजू शेट्टी म्हणाले.
लोकसभेत डीपॉजिट गेले अशा लोकांना मी गांभीर्याने घेत नाही, तुपकरांचा टोला
दरम्यान, राजू शेट्टी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल रविकांत तुपकर यांना विचारले असता, लोकसभेत डीपॉजिट गेले अशा लोकांना मी गांभीर्याने घेत नाही. माझे कार्यकर्ते त्यांना उत्तर देतील. राजू शेट्टी माझे गुरु नसून स्व. शरद जोशी आमचे गुरु असल्याचे तुपकर म्हणाले.
स्वाभिमानीतून हकालपट्टी केल्यानंतर तुपकरांचे ट्वीट चर्चेत
शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हाकालपट्टी करण्यात आली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात भूमिका घेऊन संघटनेची हानी केल्याबद्दल रविकांत तुपकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. दरम्यान, संघटनेच्या या निर्णयानंतर रविकांत तुपकर यांनी एक ट्वीट केलं होते. या ट्वीटची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली. संक्रमण होणार त्याची खूण ओळखतो, पावसाला अन् उन्हाला जून ओळखतो. माहिती आहे मला पुढची तुझी खेळी, मी तुला आतून बाहेरून ओळखतो...", असं ट्वीट रविकांत तुपकर यांनी केलं होतं. तसेच, त्याखाली त्यांनी त्यासोबतच त्यांनी सुरेश भट यांची विझलो जरी आज मी… या कवितेच्या ओळी पोस्ट केल्या आहेत. रविकांत तुपकर यांच्या सूचक ट्वीटनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होते.