एक्स्प्लोर
कार्यकर्ता मेळाव्यात सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल
बीड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला माझ्या मतदार संघात मी मोठं केलं, पण पक्षाने त्याबदल्यात मला निलंबनाचं पत्र दिलं. यापुढे जो निर्णय होईल तो सर्वानुमते असेल, असं म्हणत माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित नेते सुरेश धस यांनी पक्षाचा समाचार घेतला.
बीड जिल्ह्यातील आष्टीमध्ये सुरेश धस यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी धनंजय मुंडेंचा जोरदार समाचार घेतला.
धनंजय मुंडे यांना राज्याचं नेतृत्व दिलं असताना बीड जिल्ह्याचा नेता केव्हा होईल, असं वाटतंय. त्यांच्या या वाटेत मी एकटाच अडचणीचा ठरत होतो. त्यामुळे धनंजय मुंडेंनी सतत माझ्या विरोधात कान फुंकले, असा घणाघात सुरेश धस यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश सोळुंके आणि अमरसिंह पंडीत यांचा बोलवता धनी धनजंय मुंडे आहेत. मुर्शदपूर गटात माझ्या पत्नी विरोधात समोरच्याला मदत केली. माझ्या विरोधात मतदान करणाऱ्यांना पैसे वाटले. माझी पत्नी पराभूत व्हावी म्हणून यांचेच प्रयत्न जास्त होताना दिसले, असा घणाघाती आरोप सुरेश धस यांनी केला.
या तीन विरोधकांनी पक्षात माझं काहीच राहीलं नाही म्हणून बदनामी केली. त्यामुळे सुरेश धस काय चीज आहे, हे मी या जिल्हा परिषद निवडणुकीत दाखवून दिलं, असा टोलाही सुरेश धस यांनी लगावला.
राष्ट्रवादी सर्वसामान्य माणसांचा पक्ष आहे, याची जाणीव जनतेला करुन दिली. राष्ट्रवादीत फक्त अजित पवार यांच्यामुळे गेलो होतो, त्यांच्याबद्दल आजही आदर आहे. सर्व करुनही माझ्या वाट्याला निलंबनाचं पत्र आलं, असंही सुरेश धस म्हणाले.
ऊसतोड कामगार आणि अल्पसंख्याक असलेल्या विजय गोल्हार यांच्या पत्नीला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवण्यासाठी कुठेही आढेवेढे घेतले नाही किंवा कुठलीही अट पंकजा मुंडेंसमोर ठेवली नाही, असंही सुरेश धस यांनी सांगितलं.
सुरेश धस गटाची पंकजा मुंडेंना मदत
बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते सुरेश धस यांच्या 5 सदस्यांनी मदत केली. त्यामुळे राष्ट्रवादीचं संख्याबळ असतानाही भाजपचा अध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आला. शिवाय भाजपला शिवसंग्राम आणि शिवसेनेना आणि काँग्रेसच्या एका सदस्यानेही मदत केली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या सविता गोल्हार यांची तर, जयश्री राजेंद्र मस्के (शिवसंग्राम) यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार मंगल प्रकाश सोळंके यांना 25 मतं मिळाली, तर उपाध्यक्षपदाच्या उमेदवार शिवकन्या शिवाजी सिरसाट यांचाही पराभव झाला.
धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या वादाचा भाजपला फायदा झाला. धनंजय मुंडेंवर नाराजी असलेल्या धस यांच्या गटाच्या 5 सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे पंकजा मुंडेंना सत्ता खेचून आणण्यात यश मिळालं.
काय आहे वाद?
बीड जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून धनंजय मुंडे आणि अमरसिंह पंडित यांनाच पक्षाकडून बळ दिलं जात असल्याचा धस यांचा आरोप आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सदस्य निवडून आणण्यात धस यांचाही मोठा वाटा आहे. धनंजय मुंडे यांचं नेतृत्व सुरेश धस यांना मान्य नसल्याचं बोललं जात. त्यामुळेच त्यांनी धनंजय मुंडे यांना आव्हान दिल्याची चर्चा आहे.
संबंधित बातमी :
कानफुक्यांनी निलंबनाची कारवाई केली : सुरेश धस
सुरेश धस यांचं राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी निलंबन
स्वतःच्या रक्ताचे झाले नाहीत, त्यांनी विश्वासघातकी म्हणू नये : धस
सुरेश धस यांच्या स्वभावातच विश्वासघातकीपणा, धनंजय मुंडेंची टीका
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
महाराष्ट्र
सोलापूर
भारत
Advertisement