सोलापूर-गाणगापूर एसटी बसचा भीषण अपघात, 35 प्रवासी जखमी; ट्रॉमा केअर सेंटर रखडल्यानं रुग्णांची होतेय गैरसोय
Solapur Accident News : सोलापूर - गाणगापूर एसटी बसचा अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात झाला. सकाळी साडेदहाच्या सुमारास अक्कलकोट - मैंदर्गी रस्त्यावरील देशमुख शेतालगत बस पलटी झाली.
Solapur Accident News : सोलापूर - गाणगापूर एसटी बसचा अक्कलकोट-मैंदर्गी रस्त्यावर अपघात झाला. सकाळी साडेदहाच्या सुमारास अक्कलकोट - मैंदर्गी रस्त्यावरील देशमुख शेतालगत बस पलटी झाली. या बसमध्ये जवळपास 70 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 35 प्रवासी जखमी असून सर्वांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. प्राथमिक माहितीनुसार चार ते पाच प्रवाशांची प्रकृती ही गंभीर असल्याची देखील माहिती आहे. यातील काही रुग्णांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात देखील हलविण्यात येत असल्याची माहिती आहे.
धक्कादायक बाब म्हणजे अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात केवळ एक ते दोन डॉक्टर आहेत. त्यामुळे खाजगी डॉक्टरांना देखील या ठिकाणी तात्काळ पाचारण करण्यात आलं. खरंतर अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो लोक येत असतात. यावेळी वारंवार अपघाताच्या घटना घडत असल्याचे समोर येत आहे.
लालफितीच्या कारभारामुळे उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटरची कामे रखडून
त्यामुळे अक्कलकोटमध्ये उपजिल्हा रुग्णालय व्हावं यासाठी अनेक वर्षापासून मागणी आहे. मात्र ग्रामीण रुग्णालयावर अक्कलकोटचा कारभार सुरू आहे. तसेच वारंवार होत असलेले अपघात पाहून अक्कलकोटमध्ये ट्रॉमा केअर सेंटर देखील मंजूर करण्यात आले होते. ट्रॉमा केअर सेंटर तयार असून काही किरकोळ काम आणि उद्घाटनाअभावी रखडून आहे. ट्रॉमा केअर सेंटर सुरू झाल्यास अपघातांमध्ये जखमी झालेल्या रुग्णांना तात्काळ उपचार मिळू शकतात. मात्र लालफितीच्या कारभारामुळे उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटर या दोन्हींची कामे रखडून आहेत असा आरोप स्थानिक नागरिकांचा आहे.
अक्कलकोट मैंदर्गी रोडवर झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. "रुग्णवाहिका सोबतच मिळेल त्या वाहनाने जखमीना रुग्णालयात पाठवण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात दोन डॉक्टर उपस्थित होते. जखमींची संख्या पाहून खाजगी डॉक्टरांना तात्काळ पाचारण करण्यात आले आहे. गंभीर जखमींना सोलापूरला हलवण्यात आले आहे. ट्रामा केअर सेंटरची इमारत नुकतीच पूर्ण झाली आहे. त्यासाठी अद्याप स्टाफ मंजूर करण्यात आलेला नाही. यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर देखील ही मागणी घातली असून तात्काळ मंजूर व्हावी यासाठी प्रयत्न करेन" अशी प्रतिक्रिया अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.