निवडणूक बहिष्कराची मात्रा लागू! शिर्डी होणार नगरपरिषद
shirdi : शिर्डीकरांनी नगरपरिषदेचा दर्जा मिळावा यासाठी नगरपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार घातला होता.
Shirdi Nagarparishad : शिर्डीला नगर परिषदेचा दर्जा द्यावा या मागणीसाठी सर्व पक्षांनी नगर पंचायत निवडणुकीवर बहिष्काराची घोषणा केली होती. निवडणुकीवरील बहिष्काराची घोषणा कामी आली असून शिर्डीकरांची मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. शिर्डी आता नगरपंचायतीऐवजी नगरपरिषद होणार आहे. राज्य सरकारने याबाबतची अधिसूचना काढली आहे.
शिर्डी नगरपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा द्यावी यासाठी मागील काही महिन्यांपासून मागणी सुरू होती. लोकसंख्येचा निकष लावत नगरपंचायतची नगरपरिषद करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, राज्य सरकारकडून मागणीवर कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने अखेर शिर्डीकरांनी नगरपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्काराची घोषणा केली. या घोषणेला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे एकही निवडणूक अर्ज दाखल करण्यात आला नव्हता.
शिर्डी शहराची लोखसंख्या ३६ हजारांहून अधिक असून वाढलेली लोकसंख्या पाहता नगरपंचायत ऐवजी नगरपरिषद किंवा नगरपालिका व्हावी अशी मागणी शिर्डीकरांची होती. दोन वर्षापूर्वी उच्च न्यायालयाने राज्य शासनाला तसे निर्देश देखील दिले होते मात्र अद्याप त्यावर राज्य सरकारने निर्णय घेतला नव्हता. अखेर, नगरपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांनी घेतला.
या बहिष्काराची दखल राज्य सरकारने घेत नगरपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू असताना शिर्डीला नगरपरिषद जाहीर करण्याची अधिसूचना काढली. नगरपरिषदेच्या मान्यतेसाठी औरंगाबाद उच्च न्यायालयात ही लढा सुरू होता. नगरपरिषदेच्या अधिसूचनेवर जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती नोंदवण्यासाठी 30 दिववसांची मुदत देण्यात आली आहे. आता, राज्य सरकारने नगरपरिषदेबाबत अध्यादेश काढल्याने नगरपंचायत निवडणूक रद्द होणार का, याकडे शिर्डीकरांचे लक्ष लागले आहे.
राज्यात नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मतदान 21 डिसेंबर रोजी होणार आहे. निवडणुकीसाठी एक डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे.
पाहा व्हिडिओ: शिर्डी नगरपंचायत होणार नगरपरिषद
इतर महत्त्वाच्या बातम्या:
'ओमायक्रॉन'वर कोविड लस किती प्रभावी? कोरोनाची तिसरी लाट येणार? जाणून घ्या महत्त्वाची माहिती