(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'ओमायक्रॉन'वर कोविड लस किती प्रभावी? कोरोनाची तिसरी लाट येणार? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
Omicron Updates : ओमायक्रॉयवर लशीचा परिणाम होईल का, कोविडची तिसरी लाट येईल का याबाबत अनेक चर्चा सुरू आहेत.
Omicron Threat in India : कोरोना विषाणूचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉन (omicron) हा आतापर्यंत 30 देशांमध्ये आढळला आहे. नवीन व्हेरियंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची चर्चा सुरू आहे. लसीकरण मोहिमेला वेग देण्याची मागणी होत आहे. काही मुद्यांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण दिले आहे.
सध्या उपलब्ध असलेल्या लशीमुळे ओमायक्रॉनपासून बचाव?
ओमायक्रॉनवर सध्या उपलब्ध असलेल्या लशी कितपत प्रभावी नाहीत, याबाबत अद्याप ठोस संशोधन समोर आले नाही. लसीकरणामुळे कोविडमुळे गंभीर आजारी होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होतो. त्यामुळे लसीकरण आवश्यक आहे. ओमायक्रॉनचा व्हेरियंट लशीच्या प्रभावाला कमी करत असल्याचे अद्याप ठोस पुरावे समोर आले नाहीत. मात्र, काही म्युटेशन लशीच्या प्रभावाला कमी करू शकतात असे म्हटले जाते.
कोरोनाची तिसरी लाट येणार?
ओमायक्रॉनचा व्हेरियंट दक्षिण आफ्रिकेशिवाय इतर देशांमध्येही आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. हा व्हेरियंट मोठ्या प्रमाणावर फैलावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, बाधितांची संख्या किती असेल, आजाराची गंभीरता किती असेल, याबाबत अद्याप काही स्पष्टता नाही.
सध्याच्या कोरोना चाचणीतून ओमायक्रॉनची बाधा झाल्याचे समोर येईल का?
कोरोना चाचणीसाठी मोठ्या प्रमाणावर आरटी-पीसीआर चाचणी स्वीकारली गेली आहे. या चाचणीत विषाणूच्या विशेष जीनची ओळख पटवली जाते. ओमायक्रॉनच्या स्पाइक जीनमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. एका खास 'एस जीन'सह अन्य जीनचा उपयोग करून संबंधित व्यक्ती बाधित आहे की नाही, याची माहिती समजू शकेल. मात्र, ओमायक्रॉनच्या बाधेबाबत अंतिम दुजोरा हा जीनोम सीक्वेंसिंगनंतर दिला जातो.
ओमिक्रॉन संसर्ग टाळण्यासाठी बूस्टर डोस दिला जाईल का?
भारतातील वरिष्ठ शास्त्रज्ञांनी 40 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील लोकांसाठी लशीच्या बूस्टर डोसची शिफारस केली आहे. इंडियन जीनोमिक्स सिक्वेन्सिंग कन्सोर्टियम (INSACOG) ने ही माहिती दिली आहे. हा गट जीनोम बदलांवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने तयार केलेले नेटवर्क आहे. गटाने म्हटले की, संसर्गाचा अधिक धोका असलेल्या व्यक्तींसाठी बूस्टर डोसचा विचार केला जाऊ शकतो. यामुळे गंभीर आजाराचा धोका कमी होण्याची शक्यता आहे.
जोखम असलेल्या देशांतून 16 हजार प्रवासी भारतात
आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी संसदेत माहिती दिली की, ओमायक्रॉनचे देशात आतापर्यंत फक्त 2 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ओमायक्रॉनचा धोका असलेल्या देशांमधून 16 हजार प्रवासी आले आहेत. त्यांची चाचणी केली असता 18 कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्या जीनोम तपासणीचा अहवाल येणार आहे. त्यानंतरच त्यांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे की नाही हे स्पष्ट होणार असल्याचे त्यांनी सांगितले.