अक्षरकलेच्या सुलेखनातून विठुरायाचे दर्शन; ट्विटर, इंस्टाग्रामवरुन शितलतारा घडवणार अनोखी वारी
मुळच्या पंढरपूरच्या पण कामानिमित्त अमेरिकेत राहणाऱ्या शीतल सोनार ट्विटर, इंस्टाग्रामवरुन अनोखी वारी घडवणार आहेत. अक्षरकलेच्या सुलेखनातून विठुरायाचं अनोखं दर्शन घडवणार आहेत.

पंढरपूर : वर्षाचा हा काळ म्हणजे वारीचे वेध लागलेले असतात, वारकरी संप्रदाय गावोगावी नियोजन करण्यात गढलेला असतो. विठ्ठल दर्शनाची आस त्यांना लागलेली असते. यंदा करोनासाठीच्या निर्बंधांमुळे ही वारी नेहमीसारखी होईल असं काही वाटत नाहीये.
पण म्हणुन विठुरायाला भेटायचं नाही असं काही नाही. डिजिटल माध्यमातून आपल्या सर्वांना अक्षरकलेच्या म्हणजेच सुलेखनातून देवाचे दर्शन शितलतारा घडवणार आहे. तिचा अक्षरकलावारी हा उपक्रम ट्विटर, इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. यंदा येत्या गुरुवार (1 जुलै) पासून रोज एक आर्टवर्क ती दोन्ही प्लॅटफॉर्मवर पोस्ट करणार आहे.
हे उपक्रमाचे चौथे वर्ष असून गेल्या वर्षी 8 लाख लोकांपर्यंत हा उपक्रम पोहोचला असं ती सांगते. मूळची पंढरपूरची असलेली शीतल आता कामानिमित्त अमेरिकेतील बोस्टन येथे असते. "माझा जन्म पंढरपूरचा आणि माझं अर्ध शिक्षणही पंढरपुरताच झालं, तिथल्या मातीशी नाळ जोडलेली आहे, ती या मुळेच. लहानपणापासून जेवढा विठ्ठल अनुभवला होता, तर तो अक्षरचित्र रूपात कसा दिसू शकेल, या मध्यवर्ती संकल्पनेतून हा उपक्रम मी राबवते आहे. रोज एक अभंग घेऊन त्यावर सुलेखन रचना आणि चित्रकलेचे प्रयोग मी विठ्ठलाला साकारण्यासाठी केले. या प्रमाणे अनेक सुलेखने आणि त्यामागील विचार आषाढी एकादशीपर्यंत ट्विट करते." असं तिने आमच्याशी बोलताना सांगितलं.
गणपती आणि कृष्ण हे जेवढे रेखांकित केले गेले तेवढं भाग्य इतर देवांच्या वाट्याला आलेलं नाही. मुळात कुठलंही रूप रेखांकित करताना गाभा हा सर्वव्यापी असावा लागतो, एक ऑरा असावी लागते, कमी आकारांमधून मूळ रूपाचा अर्थबोध व्हायला हवा असतो, हे सर्व विठ्ठलाच्या ठिकाणी उदंड आहे आणि अजून हवं तेवढ्या कलाकृती या विषयावर बनलेल्या नाहीत. अशी शितलची भावना आहे.
विठ्ठल हा मराठी संस्कृतीचा एक मोठा घटक आहे. अभंग, संतसाहित्य, वारी हे महत्वाचे घटक विठ्ठलाशी संबंधित आहेत. मराठी भाषेत मुळात सुलेखन फार कमी केलं जातं. विठ्ठल जेवढा पहिला जातो तेवढा लिहिला जात नाही असं तिचं म्हणणं आहे.
वारी हा उत्सव फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून जागतिक पातळीवर साजरा व्हावा, प्रत्यक्ष सहभागी होता येत नसेल तरीही मिळेल त्या मार्गाने आपण त्यात सहभागी व्हावं म्हणून अक्षरकलावारी उपक्रम आहे.
तुम्हीसुद्धा सहभागी व्हा, आणि भक्तिरसात न्हाऊन निघा.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
