(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NCP Crisis : शिंदेंच्या शिवसेनेला जो न्याय, तोच न्याय अजित पवारांच्या राष्ट्रवादीला? शरद पवार गटाची धाकधूक वाढली
Shiv Sena MLA Disqualification Verdict: शिवसेना पक्षासंबंधित निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय कायम ठेवत विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंचीच शिवसेना खरी असल्याचा निकाल दिला.
Shiv Sena MLAs Disqualification : शिवसेना कुणाची यावर निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwkar) निवडणूक आयोगाचा निकाल कायम ठेवत शिंदेंचा दावा मान्य केला. शिवसेनेत फूट पडताना बहुमत हे शिंदेंकडे असल्याचं सांगत राहुल नार्वेकरांनी शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचं सांगितलं आहे. या निकालामुळे राष्ट्रवादीचा अजित पवार गट (Ajit Pawar) मात्र निश्चिंत झाला असून शरद पवार (Sharad Pawar) गटाची धाकधूक मात्र वाढल्याचं दिसतंय. कारण जो न्याय शिदेंना मिळाला तोच न्याय अजित पवारांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेवर निकाल आला असून विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या याचिका फेटाळून लावल्या आणि कुणालाही अपात्र केलं नाही. पण त्याचवेळी बहुमताच्या आधारे त्यांनी शिंदेंचा शिवसेनेवरील दावा मान्य केला आणि उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. आता यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत सुनावणी होणार आहे.
बहुमताचा आधार घेतला तर अजित पवार वरचढ
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगात त्यांची लढाई सुरू आहेत, त्याचसोबत विधीमंडळातही त्यांचा वाद सुरू आहे.अशा वेळी जर विधीमंडळात बहुमताचा आधार घेण्यात आला असेल तर अजित पवारांची बाजू वरचढ ठरते.
राष्ट्रवादीच्या एकूण 53 आमदारांपैकी 40 हून अधिक आमदार हे अजित पवारांकडे आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष जर राष्ट्रवादी कुणाची यावर निकाल देणार असतील आणि शिवसेनेप्रमाणे त्यांनी जर बहुमताचा आधार घेतला तर अजित पवारांची बाजू भक्कम दिसतेय.
अजित पवार गटाचा व्हिप लागू होणार?
बहुमताप्रमाणेच पक्षाच्या व्हिपसंदर्भातही राहुल नार्वेकरांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ठाकरे गटाचे व्हिप सुनील प्रभू यांचा व्हिप त्यांनी ग्राह्य धरला नाही तर त्यांनी शिंदे गटाचा व्हिप योग्य असल्याचं सांगत भरत गोगावले यांची निवड योग्य ठरवली. याचा फायदा अजित पवार गटाला होण्याची शक्यता आहे. शिवसेनेप्रमाणे न्याय लावला तर शरद पवार गटाचे व्हिप जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती चुकीची ठरवली जाईल आणि अजित पवार गटाचे व्हिप अनिल पाटील यांची निवड योग्य ठरवली जाईल. व्हिपच्या बाबतीत अजित पवार गटाची बाजू अजून स्पष्ट आणि वरचढ आहे. कारण अनिल पाटील हे राष्ट्रवादीच्या फुटीच्या आधीही व्हिप होते. अजित पवारांनी बंड केल्यानंतर अनिल पाटील हे त्यांच्यासोबत गेले. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना व्हिपचा निर्णय घ्यायला अजून सोपं होणार आहे.
आमदार मात्र अपात्र ठरण्याची शक्यता कमी
राहुल नार्वेकरांनी शिवसेनेच्या कोणत्याही आमदाराला अपात्र ठरवण्यास नकार दिला. त्यांनी दोन्ही बाजूंकडील याचिका फेटाळल्या आणि कुणालाही अपात्र केलं नाही. त्याच प्रमाणे जर त्यांनी राष्ट्रवादीबाबत निर्णय घेतला तर शरद पवार असो वा अजित पवार गट असो, दोन्ही बाजूकडील आमदार अपात्र ठरणार नाहीत.
शरद पवार गटाची धाकधूक वाढली
राहुल नार्वेकरांनी शिवसेनेबाबत निर्णय देताना पक्ष संघटनेपेक्षा विधीमंडळातील बहुमताचा विचार केला. त्यामुळे ठाकरे गटाला धक्का तर बसला, पण राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची धाकधूकही वाढली आहे. कारण विधिमंडळातील बहुमत हे सध्या अजित पवार गटाकडे आहे.
राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर अजित पवारांनी दावा केला असून हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचला आहे. दोन्ही बाजूंकडून त्या संबंधित युक्तिवाद सुरू असून कागदपत्रेही जमा करण्यात आली आहेत. आता निवडणूक आयोग त्यावर काय निर्णय घेतंय हे पाहावं लागेल.
ही बातमी वाचा: