MLA Disqualification Case : सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरोधात विधानसभा अध्यक्षांचा निर्णय; शरद पवारांचे मुद्यावर बोट
Shiv Sena MLA Disqualification Case : सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जावे लागेल. त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळेल अशी खात्री वाटत असल्याचेही पवार यांनी म्हटले.
Shiv Sena MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाच्याविरोधात जाऊन निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) राजकीय संघटनेला महत्त्व दिले तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) विधिमंडळ पक्षाला महत्त्व दिले असल्याचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले. सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जावे लागेल. त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळेल अशी खात्री वाटत असल्याचेही पवार यांनी म्हटले. यावेळी बोलताना शरद पवार यांनी शिवसेना कोणाची आहे, हे लोकांना माहीत आहे. आजच्या निकालानंतर मशाल मोकळी झाली असल्याचे सूचक वक्तव्य पवारांनी केले.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिला. त्यांनी आपल्या निकालात शिवसेना ही शिंदे यांच्या नेतृत्वातील असल्याचा निर्वाळा दिला. तर, दुसरीकडे शिंदे आणि ठाकरे गटातील कोणत्याही आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली नाही. नार्वेकर यांनी दिलेल्या निकालानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले आहेत. पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे दुर्लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले की, आजच्या निकालात यत्कचिंतही आश्चर्य वाटत नाही. आम्ही आपसात जी चर्चा करायचो की हा निकाल उद्धव ठाकरेंना अनुकूल नसेल. मुख्यमंत्र्यांना हा निकाल त्यांच्या बाजूने लागेल हा आत्मविश्वास वाटत होता. सत्ताधारी आणि त्यांच्या आमदारांनी निकालाबाबत वर्तवलेली शक्यता आजच्या निकाला ध्वनित झाल्याचे पवार यांनी म्हटले. त्यांनी म्हटले की, उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल आणि तिथे उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल अस आजच्या निकालावरून वाटत आहे. विधिमंडळापेक्षा पक्ष संघटना महत्वाची असते हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र विधिमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वेगळा निकाल दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या निकालानुसार व्हीप बजावण्याचा अधिकार पक्ष संघटनेला असतो. विधिमंडळाला नाही याकडे ही पवार यांनी लक्ष वेधले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दोन्ही बाजूंना पात्र ठरवले आहे. नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय बदलले आहेत. सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांना संधी आहे. उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने राहिलेत. या निकालाचा आमच्यावर परिणाम होणार नसल्याचे पवारांनी म्हटले.
नार्वेकरांनी संधी दिलीय, लवकर कार्यक्रम करू
राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पायमल्ली आहे हे सांगण्याची संधी आम्हाला महाविकास आघाडीला प्राप्त झाली आहे. आम्ही तो कार्यक्रम लवकरच सुरू करू अशी घोषणाही पवार यांनी केली.
मशाल मोकळी झाली
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही खरी शिवसेना हे लोकांना माहीत आहे. निकाल दोन दिवसांवर आला असताना नार्वेकर मुख्यमंत्र्यांना भेटायला जात असतील तर निकाल स्पष्ट होता. त्यामुळे इतरांच्या बाबतीत देखील असाच निकाल येईल अशी शक्यता आहे, असेही पवार यांनी म्हटले.