माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांनाही दप्तर दिरंगाईचा फटका, रितेश देशमुखच्या 7/12 वरील कोट्यवधीच्या कर्जाचं सत्य काय?
अभिनेता रितेश देशमुख आणि काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी 4 कोटी 70 लाखांच्या कर्जमाफीचा लाभ घेतल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र या कर्जात रितेश आणि अमित देशमुख सहकर्जदार होते. तर मुळ कर्जदार अमित देशमुख यांच्या पत्नी अदिती देशमुख या आहेत.
लातूर : अभिनेता रितेश देशमुख आणि काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी 4 कोटी 70 लाखांच्या कर्जमाफीचा लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. तशा आशयाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र रितेश देशमुखने या आरोपांचं खंडन केलं आहे. मात्र रितेश देशमुखने कर्ज न घेतल्याचा दावा अर्धसत्य आहे. सरकारी कामाचा देशमुख बंधूना फटका बसला आहे. रितेश देशमुख आणि अमित देशमुख यांनी कर्ज घेतलं होतं, मात्र ते सहकर्जदार होते. मुळ कर्जदार अमित देशमुख यांच्या पत्नी अदिती देशमुख या होत्या. या तिघांना 2011 मध्ये कर्ज मंजूर झालं असलं तरी ती रक्कम त्यांनी घेतलेली नाही, अशी माहिती समोर येत आहे.
राज्यातील नवीन सरकारच्या सरसकट कर्जमाफीचा विषय सध्या चर्चेत आहे. याचा फायदा मोठ्या कर्जदारांना होणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. यातूनच अभिनेता रितेश देशमुख यांचे चार कोटीचे कर्ज माफ होणार अशी पोस्ट सोशल माध्यमावर व्हायरल झाली. रितेश देशमुख यांनी प्रत्यक्षात हे कर्ज घेतले नसून त्याच्या आमदार असलेल्या बंधू अमित देशमुख यांच्या पत्नीच्या नावे हे कर्ज आहे. रितेश देशमुख हे या प्रकरणात सहकर्जदार आहे.
कशासाठी घेतलं होतं कर्ज?
अदिती देशमुख यांनी ऊस तोडणी यंत्रासाठी हे कर्ज घेतलं होतं. जवळपास 1 कोटी 56 लाख 88 हजार रुपयांच्या दोन ऊस तोडणी यंत्र घेण्यासाठी हे कर्ज घेतलं होतं. यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या काही अटी होत्या. त्यात शेतजमीन क्षेत्र कमीतकमी 25 एकर असावे, अशी अट होती. मात्र अदिती देशमुख यांच्या नावे तेवढी जमीन नसल्याने कर्ज मंजूर होऊ शकत नव्हतं. त्यामुळे कर्ज प्रस्तावाला सहकर्जदार अमित देशमुख आणि रितेश देशमुख यांची बाभळगाव आणि सारसा शिवारातील शेतजमीन सहतारण देण्यात आली.
अटींची पूर्तता झाल्यानंतर आदिती देशमुख यांना 19 नोव्हेंबर 2011 च्या मंजुरी पत्रानुसार, 1 कोटी 56 लाख 88 हजारचे कर्ज मंजूर करण्यात आलं. कर्ज मंजूर करण्यात आलं, मात्र बँकेच्या काही अटी होत्या. त्यात मंजूर कर्जाच्या तिप्पट बोजा कर्जदार आणि सहकर्जदार यांच्या शेतीवर लावण्यात आला. त्याची एकत्रित रक्कम 4 कोटी 70 लाख 64 हजार होती.
या कर्जाचे पुढे काय झाले?
2011 साली हे कर्ज मंजूर करण्यात आलं होतं. मात्र 2011 पासून आजपर्यंत हे कर्ज कर्जदाराने उचललेच नाही. मात्र कर्जदाराच्या सातबारावर बोजा तसाच राहिला. 28 डिसेंबर 2017 रोजी कर्जदाराच्या विनंतीनुसार हा बोजा कमी करण्यात यावा, असा पत्रव्यवहार तलाठ्याकडे आणि बँकेकडे करण्यात आला. तरीही अद्याप कर्जाचा बोजा सातबारावर तसाच ठेवण्यात आला आहे. या सर्व घोळाचा फटका देशमुख बंधूना बसला आहे. देशमुख कुटुंबियांना लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने याबाबत खुलासा देखील दिला आहे. मात्र माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाला दप्तर दिरंगाईचा फटका बसत असेल, तर सर्वसामन्य जनतेचं काय होत असेल याचा अंदाज न लावलेलाच बरा.