Sanjay Rathod | केवळ राजीनामा नको, राठोडांना अटक करा; चंद्रकांत पाटील
संजय राठोड यांच्या केवळ राजीनाम्यानं भागणार नाही तर संजय राठोडांना अटक करा आणि पूजा चव्हाणला न्याय द्या अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अखेर संजय राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पण केवळ त्यांच्या राजीनाम्यानं भागणार नाही तर राठोडांना अटक करा अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
संजय राठोडांचा राजीनामा या आधीच घ्यायला हवा होता असं चंद्रकांत पाटील म्हणाले. संजय राठोड यांचा राजीनामा हा लोकांचा दबाव, भाजपचे आंदोलन आणि माध्यमांनी सातत्याने लावून धरलेला विषय यामुळे घेण्यात आल्याचं सांगत चंद्रकांत पाटील म्हणाले की, "राठोडांचा केवळ राजीनामा घेऊन भागणार नाही, तर त्यांना अटक करा आणि पूजा चव्हाणला न्याय द्या."
Sanjay Rathod | मोठी बातमी : संजय राठोड यांचा अखेर मंत्रीपदाचा राजीनामा
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांनी अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. संजय राठोड यांनी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि आपला राजीनामा सादर केला आहे. या विषयावर मुख्यमंत्री आणि संजय राठोड यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली. या प्रकरणात शिवसेनेची बदनामी होत आहे आणि निर्दोष असाल तर पुन्हा विचार करु असं उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना सांगितल्याचं समजतंय.
संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा म्हणून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या विषयावर सातत्याने आवाज उठवला होता. संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा भारतीय जनता पक्षाने घेतला होता. तसेच संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा यासाठी शनिवारी राज्यभरात आंदोलन करण्यात आलं होतं.
संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांची बदनामी करण्यात आली असून त्यांना राजकीय जीवनातून उठवण्याचं कारस्थान विरोधकांनी रचलं आहे.