Pooja Chavan Death Case | राजीनामा देतो, चौकशी झाल्यावर मंजूर करा: संजय राठोडांची मुख्यमंत्र्याकडे विनवणी
संजय राठोड 'वर्षा' बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत. त्यावेळी राजीनामा देतो पण चौकशी झाल्यावर तो मंजूर करा अशी विनवणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं समजतंय.
मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर दबाव वाढत आहे. अधिवेशनाच्या आधी संजय राठोडांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू न देण्याचा इशारा भाजपने दिलाय. त्यामुळे आज संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान 'वर्षा' वर मुख्यंमंत्र्यांची भेट घेतली आणि राजीनामा देतो पण चौकशी झाल्यावर तो मंजूर करा अशी विनवणी केली आहे.
मुख्यमंत्री आणि संजय राठोड यांच्यादरम्यान चर्चा सुरु आहे. यावेळी एकनाथ शिंदे आणि अनिल परबही उपस्थित आहेत. आता संजय राठोड यांच्या या प्रस्तावावर मुख्यमंत्री काय निर्णय घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर शनिवारी सकाळी संजय राऊत यांनी सूचक विधान केलं होतं. संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातला राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजे राजधर्माचे पालन!" पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी संजय राठोडांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधकांचा दबाव वाढत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देखील नाराजीचा सूर आळवला आहे. अशातच आता मुख्यमंत्र्यांवर स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यांकडून दबाव वाढत चाललाय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
.... तर संजय राठोड यांना आमदारकीचाही राजीनामा द्यायला सांगू: महंत जितेंद्र महाराज
संजय राऊत यांच्या या सूचक ट्वीटनंतर मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा आता घेतला जाईल असा तर्क बांधला जात होता. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा असा दबाब मुख्यमंत्र्यांवर वाढत असताना आता पोहरादेवीच्या मंहंतांनी मुख्यंमंत्र्यांना एक पत्र लिहलंय. संजय राठोड यांचा तडकाफडकी राजीनामा घेऊ नये अशी विनंती त्या पत्रात करण्यात आली आहे. संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्यास त्यांना पोहरादेवीवरुन शिवसेनेच्या आमदारकीचाही राजीनामा द्यायची विनंती करू असंही मंहंतानी सांगितलंय.