(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पॉलिटेक्निक प्रवेशाला आजपासून सुरवात, विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दहावी निकालाआधी भरता येणार
Polytechnic Admission : आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता पॉलिटेक्निकच्या दुसऱ्या वर्षाला कुठल्याही शाखेत प्रवेश मिळणार आहे.
मुंबई: उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आज महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाला (Polytechnic Admission) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या वर्षी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. आज या प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन पोर्टलचे उद्घाटन राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. पॉलिटेक्निक प्रवेशासाठी आजपासून दहावीचा निकाल जाहीर होण्याआधीच विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करून अर्ज भरता येणार आहे.
अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाइन पोर्टल मध्ये दहावीचे गुण अपलोड केले जातील. त्यामुळे अत्यंत सुलभ पद्धतीने ऑनलाईन पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया पार पडेल. आधी आधी प्रवेश पॉलीटेक्निक अभ्यासक्रमाला होतील असा विश्वास असल्याचं राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. अभय वाघ यांनी सांगितले.
आयटीआय झालेल्या विद्यार्थ्याना दुसऱ्या वर्षात प्रवेश
दहावीनंतर आयटीआय उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता पॉलीटेक्निक अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला कुठल्याही शाखेमध्ये प्रवेश घेता येणार आहे. हा एक महत्त्वपूर्ण निर्णय असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल, असे मत उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केलं. या वर्षी होणाऱ्या सीईटी परीक्षेचा निकाल हा सिटी परीक्षा झाल्यानंतर दहा दिवसात जाहीर करण्याचा प्रयत्न विभागाकडून केला जाईल. जेणेकरून नवे शैक्षणिक वर्ष हे वेळेत सुरू व्हाव्यात आणि प्रवेश प्रक्रियेला उशीर होणार नाही, असं सुद्धा मंत्री सामंत यांनी सांगितलं.
ज्या विद्यार्थ्याचं पितृ आणि मातृछत्र हरवले आहे अशा विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये दोन जागा राखीव असतील. शिवाय त्यांच्या शिक्षणासाठी राज्य सरकारकडून पन्नास हजार रुपये खर्च केला जाणार आहे. विद्यापीठांच्या ऑनलाइन ऑफलाइन संदर्भातील संभ्रम विद्यार्थ्यांनी दूर करून पुढील सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीने देण्याची मानसिकता ठेवावी. कारण सर्व विद्यापीठांच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा या ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत असं मंत्री सामंत यांनी सांगितलं.