मुंबईत ओमायक्रॉनचा समुह संसर्ग?, 24 तासांत 190 नवे रुग्ण; राज्यातील एकूण संख्या 450
Omicron Variant In Maharashtra : गुरुवारी राज्यात 198 नवीन ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी तब्बल 190 रुग्ण हे मुंबईतील आहेत. तर चार रुग्ण ठाण्यातील आहेत.
Omicron Variant In Maharashtra : ओमायक्रॉन व्हेरियंटने राज्याची चिंता वाढवली आहे. दररोज ओमयाक्रॉनबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळते. राज्यातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 450 वर पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी राज्यात 198 नवीन ओमायक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी तब्बल 190 रुग्ण हे मुंबईतील आहेत. तर चार रुग्ण ठाण्यातील आहेत. सातारा, नांदेड, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आज प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. बुधवारी राज्यात 85 नवीन ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले होतेत. गुरुवारी यामध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 450 इतकी झाली आहे. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 327 इतकी झाली आहे. म्हणजेच 60 टक्केंपेक्षा जास्त रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, राज्यातील 450 रुग्णांपैकी 125 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे.
राज्यात कुठे किती ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत?
मुंबई - 327 रुग्ण
पिंपरी चिंचवड - 26 रुग्ण
पुणे ग्रामीण - 18 रुग्ण
पुणे शहर - 12 रुग्ण
ठाणे - 12 रुग्ण
नवी मुंबई - 7 रुग्ण
पनवेल - 7 रुग्ण
कल्याण डोंबिवली - 7 रुग्ण
नागपूर - 6 रुग्ण
सातारा - 6 रुग्ण
उस्मानाबाद - 5 रुग्ण
वसई विरार - 3 रुग्ण
नांदेड - 3 रुग्ण
औरंगाबाद - 2 रुग्ण
बुलढाणा - 2 रुग्ण
भिवंडी - 2 रुग्ण
लातूर - 1 रुग्ण
अहमदनगर - 1 रुग्ण
अकोला - 1 रुग्ण
मीरा भाईंदर- 1 रुग्ण
कोल्हापूर - 1 रुग्ण
राज्यात आढळलेल्या ओमायक्रॉन रुग्णांमध्ये 26 रुग्ण इतर राज्यातील आहेत, जे विदेशातून महाराष्ट्रात आले होते. 9 रुग्ण हे विदेशी नागरिक आहेत. राज्यात एक नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे.
राज्यात गुरुवारी 5 हजार 368 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात आज तब्बल 5 हजार 368 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1193 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आज 22 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 18 हजार 217 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 7 हजार 330 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.55 टक्के आहे. सध्या राज्यात 1 लाख 33 हजार 748 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1078 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 88 , 87, 303 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.