एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना मुंबई पोलीस चौकशीसाठी समन्स पाठवण्याची शक्यता
Mumbai Drugs Case : एनसीबी (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी पोलीस साध्या वेशात त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला आहे
मुंबई : एनसीबी (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना मुंबई पोलीस चौकशीसाठी समन्स पाठवणार आहे. मुंबई पोलीस पाळत ठेवत असल्याचा समीर वानखेडेंनी आरोप केला होता, त्यानंतर चौकशीसाठी आदेश देण्यात आले आहे.
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंनी त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा करत मुंबई पोलिसांत तक्रार केली होती. त्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी सुरु केल्याची माहिती मिळतेय. समीर वानखेडेंनी सादर केलेल्या पुराव्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही प्रश्न विचारल्याचं कळतंय.
दरम्यान सीसीटीव्हीमध्ये दिसणारे दोन्ही कॉन्स्टेबल ओशिवाराच्या डिटेक्शन विभागाचे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या दोन कर्मचाऱ्यांनाचे फोटो समोर आले आहे. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली. चौकशीमध्ये दोन कर्मचाऱ्यांनी सांगितले की, हे फोटो कुठले आहे हे त्यांच्या लक्षात नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नेहमी आपल्या कामाच्या निमित्ताने अनेक लोकांच्या भेटीघाटी घेत असतात. याचा अर्थ असा नाही की पोलिस कोणावर पाळत ठेवत आहे.
2 ऑक्टोबर रोजी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंच्या नेतृत्त्वात एनसीबीच्या एका पथकानं कॉर्डेलिया क्रूझवर छापा मारला होता. एजंन्सीनं दावा केला आहे की, क्रूझवरील छापेमारीत ड्रग्ज जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह एकूण 18 जणांना एनसीबीनं अट केल्याचं सांगितलं. क्रूझ ड्रग्ज प्रकरणी करण्यात आलेल्या छापेमारीनंतर राष्ट्रवादीकडून एनसीबीवर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले. महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी दावा केला होता की, एनसीबीनं केलेली कारवाई ही बनावट होती आणि यामध्ये भाजप नेत्यांसह अनेक बाहेरचे लोक सहभागी होते. तसेच नवाब मलिकांनी आरोप केला आहे की, एनसीबीने सुरुवातीला 11 लोकांना अटक केली होती. परंतु, भाजप नेते मोहित भारतीय यांच्या एका निकटवर्तीयासह तिघांना अवघ्या काही तासांत सोडण्यात आलं. तसेच पुढे बोलताना त्यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या फोन रेकॉर्ड्सचा तपास करणं गरजेचं आहे, अशी मागणीही केली.