जिलेटीन वाहतूक करणाऱ्या गाडीचा अपघात होऊन भयंकर स्फोट, तीन किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला
मुदखेड तालुक्यातील पंढरवाडी रस्त्यावर जिलेटीन वाहून नेणाऱ्या गाडीचा अपघात होऊन स्फोट झाला. या घटनेमुळे तीन किलोमीटरपर्यंतच्या परिसरात हादरे जाणवले.
नांदेड : मुदखेड तालुक्यातील पंढरवाडी रस्त्यावर जिलेटीन वाहून नेणाऱ्या गाडीचा अपघात होऊन स्फोट झाल्याची भीषण घटना घडलीय. पंढरवाडी ते मुदखेड प्रवासादरम्यान सदर गाडीचे चाक निखळल्याने अपघात झाला आणि गाडीला आग लागली. परिसरातील नागरिकांच्या समय सुचकतेमुळे लोक अपघाताच्या ठिकाणी धावून गेले व अपघात ग्रस्त गाडीतून चालकाला बाहेर काढले. गाडीत जिलेटीन स्फोटकाची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी रस्त्यावरून रहदारी करणाऱ्या वाहनांची वाहतूक थांबवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
या घटनेत गाडीच्या स्फोटाची दाहकता एवढी मोठी होती की परिसरातील एक किलोमीटरच्या झाडांची व पिकांची पानेही गळून पडली तर ऊस, ज्वारी ह्या पिकांचेही मोठे नुकसान झालेय. ह्या स्फोटाच्या जागेवर जमिनीत 20 फूट खोलीचा खड्डडा पडलाय. जिलेटीन स्फोटक वाहतूक करताना खबरदारी न बाळगल्यामुळे गाडीचा स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतायत. स्फोटामुळे जवळपासचा परिसरात हादर बसला असून मुदखेड परिसरात भीतीचे वातावरण आहे. परिसरातील नागरिकांनी वेळीच खबरदारी बाळगून वाहतूक थांबवल्यामुळे जीवितहानी टळली व मोठी दुर्घटना झाली नाही.
प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्याकडून मिळालेली माहिती अशी की भोकरहुन नांदेडला जिलेटिन भरून घेऊन जाणाऱ्या गाडीच्या मागच्या चाकात बिघाड झाला होता. त्यामुळे गाडी रस्त्याच्या बाजूला उलटली. काही शेतकऱ्यांनी धाव घेऊन चालकाला गाडीच्या बाहेर काढले, गाडी पलटी झाल्याने गाडीतील जिलेटीन कांड्याचा स्फोट होणार अशी शंका आल्याने ड्रायव्हरने मदतीसाठी धाऊन आलेल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पलटी खाल्लेल्या वाहनापासून दूर जाण्याचा इशारा दिला.
आसपासचा परीसर हादरला
काही वेळात गाडीचा भयंकर स्फोट झाला. स्फोट इतका मोठा होता की मुदखेड शहर तीन किलोमीटर अंतरावर असतानाही शहरातील घरावरील पत्रे, खिडकीचे तावदाने, बंद दुकानाचे शटर हादऱ्याने थरथरले, पार्डी येथेही असाच प्रकार झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या स्फोटामुळे गाडी पलटी खालेल्या रस्त्याच्या बाजूला जाग्यावर दहा ते पंधरा फुटाचा मोठा खड्डा पडला. यावरून स्फोटाची तीव्रता किती भयंकर स्वरूपाची होती हे स्पष्ट होतेय. घटनास्थळा शेजारील शेतातील पिकांचे, झाडांचे मोठे नुकसान झाले तर आजूबाजूच्या झाडांना स्फोटामुळे पानेही राहिले नाहीत. तर गाडीचे इंजन 40 फुट अंतरावर तर चाकं 15 फुट अंतरावर उडून पडलेत. काही अंतरावर शेतकऱ्याला व दोन म्हशीला स्फोटातून उडालेल्या खड्यांनी जखमी केलं.
फोरन्सिक लॅब तपास करणार
घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेऊ वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. फोरन्सिक लॅब या पथकांना पुढील तपासासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. प्रथम दर्शनी जिलेटिन कांड्यांचा स्फोट असल्याचे स्पष्ट झाले असले तरीही पोलीस तपासानंतर याबाबतची सविस्तर माहिती कळेल. तुर्तास गाडी चालकाचा व शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली. सदरील घटनेचा सर्व दृष्टीने तपास पोलीस करत असल्याची माहिती पोलीस निरिक्षक महेश शर्मा यांनी दिलीय.