(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बीडचे आमदार संदीप क्षीरसागर पक्षावर नाराज, जिल्हा परिषद निवडणुकीपासून अलिप्त
बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही अलबेल नाही, असे स्पष्ट दिसू लागले आहे. चार दिवसांपूर्वी पक्षावर नाराज असणाऱ्या आमदार प्रकाश सोळंके यांची मनधरणी करण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुढाकार घ्यावा लागला होता. त्यांचे बंड शांत होत नाही तोच आता बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हेदेखील पक्षावर नाराज असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
बीड : जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळं काही अलबेल आहे का? असा प्रश्न जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर उपस्थित होऊ लागला आहे. चार दिवसांपूर्वी नाराज असणाऱ्या आमदार प्रकाश सोळंके यांची मनधरणी करण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री धनंजय मुंडे यांना पुढाकार घ्यावा लागला. त्यांचे बंड शांत होत नाही तोच आता बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हेदेखील जिल्हा परिषद निवडणुकीत डावलल्यामुळे पक्षावर नाराज असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
बीड जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवकन्या शिरसाट यांची तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांची निवड झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व सूत्र मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे दिली होती. त्यांनी दहा-बारा दिवसांपासून राष्ट्रवादीसह काँग्रेस आणि भाजपच्या सदस्यांना अज्ञात स्थळी ठेवले होते. बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ओबीसी महिलेसाठी राखीव होते. त्यामुळे या पदासाठी संदीप क्षीरसागर यांच्या आईच्या नावाची चर्चा होती.
दरम्यान, पुन्हा एकदा अध्यक्षपद आपल्याला हुलकावणी देणार, अशी शक्यता निर्माण झाल्यानंतर संदीप क्षीरसागर हे या संपूर्ण प्रक्रियेपासून दूर राहिले. मंत्री धनंजय मुंडे हे शहरातील एका हॉटेलवर बैठका घेत असताना प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित यांच्यासह अनेक दिग्गज येथे हजर असताना संदीप क्षीरसागर मात्र या बैठकींकडे फिरकलेदेखील नाहीत. झेडपी निवडणुकीत पक्षाने डावलल्यामुळे संदीप क्षीरसागर हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही अलबेल नाही, असे स्पष्ट दिसत आहे.
विशेष म्हणजे बीड जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस प्रयत्न करत असताना राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर शहरात असूनही या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले नाहीत. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्याच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व करणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यासमोर गटातटात विखुरलेल्या राष्ट्रवादीला एकसंघ करणं हे मोठे आव्हान धनंजय मुंडे यांच्यासमोर असणार आहे.
बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा भाजपला धक्का? | ABP Majha