(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Unlock : दिवाळीनंतर कोरोनाच्या एकाच लसीच्या डोसवर मुक्त संचार! राजेश टोपेंची महत्वाची माहिती
Maharashtra Unlock : राज्यात कोरोनाचा (Maharashtra Corona Update) प्रादुर्भाव कमी होत चालला असल्याने अनेक नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.
Maharashtra Unlock : राज्यात कोरोनाचा (Maharashtra Corona Update) प्रादुर्भाव कमी होत चालला असल्याने अनेक नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. आता महाराष्ट्र हळूहळू संपूर्ण अनलॉक होण्याच्या दिशेनं प्रवास करत आहे. शाळा, मंदिरं सुरु झाल्यानंतर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्वाची माहिती दिलीय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे की, दिवाळीनंतर नागरिकांना कोरोनाच्या एकाच लसीच्या डोसवर मॉल, लोकल तसेच इतर सर्वच ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. दिवाळीनंतर मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिलीय. दिवाळीत कोरोना रुग्ण संख्येचा आढावा घेऊन लोकांना होणाऱ्या या असुविधेतून वाचवण्यासाठी लसीची एक मात्रा देखील पुरेशी ठरणार आहे. टास्क फोर्सच्या सहमतीने मुख्यमंत्री दिवाळी नंतर निर्णय घेतील, असं टोपे म्हणाले.
टोपे म्हणाले की, आताच दसरा झाला आहे. दिवाळी येतेय. संपूर्ण संणामध्ये लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मंदिरं, थिएटर्स उघडली आहेत. आता यानंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी वाढते या सर्व पार्श्वभूमिवर निर्णय होईल, असं ते म्हणाले. संख्या आटोक्यात राहिली तर सवलत मिळेल, असं ते म्हणाले. आरोग्य सेतू अॅपमध्ये जर 'सेफ' असं स्टेटस आल्यास सवलती मिळू शकतील. राज्यामध्ये दिवाळीनंतरच्या कोरोना आकडेवारीनंतर आरोग्य विभागाशी चर्चा करुन मुख्यमंत्री निर्णय घेतील, असं टोपे म्हणाले.
टोपे म्हणाले की, राज्यात मोठ्या स्तरावर हर्ड इम्युनिटी आलेली असेल आणि टास्क फोर्स, आरोग्य विभागाची सहमती असेल तर असा निर्णय घेतला जाऊ शकतो. कोविशील्डच्या पहिल्या डोसनंतर 84 दिवसांचा कालावधी दुसऱ्या डोससाठी दिला आहे. त्यामुळं मोठं अंतर असल्यानं असुविधा होते. त्यामुळं आरोग्याची बाब लक्षात घेऊन यावर निर्णय होईल, असंही टोपे म्हणाले.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य सरकार अनेक गोष्टी अनलॉक करत आहेत. राज्य सरकारने नुकतंच शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 22 ऑक्टोबरनंतर सिनेमागृहे आणि नाट्यगृहे सुरु होणार आहेत.