'आंदोलन मागे घेणार नाही'; गुन्हा दाखल झाल्यावर इम्तियाज जलील यांची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar: गुन्हे दाखल झाले तरीही आंदोलन सुरूच राहणार असल्याचं जलील म्हणाले.
Chhatrapati Sambhajinagar: औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) करण्याच्या निर्णयावरून आता राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. दरम्यान नामांतराविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी उपोषण सुरु केले आहे. तर गुरुवारी जलील यांनी कँडल मार्च काढला होता. पण परवानगी नसताना आंदोलन काढल्याने त्यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. तर यावर प्रतिक्रिया देताना जलील म्हणाले की, माझ्यावर दाखल केलेला गुन्हा औरंगाबाद नावापेक्षा मोठा नाही. तसेच असे गुन्हे दाखल झाले तरीही आंदोलन सुरूच राहणार असल्याचं जलील म्हणाले.
दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना जलील म्हणाले की, माझ्यावर दाखल केलेला गुन्हा औरंगाबाद नावापेक्षा मोठा नाही. राजकीय दबावापोटी पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. पण हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी दिलीय. शिवाय काल शिवसेना नेत्यांच्या घरासमोर आंदोलन झाले होते, त्यांच्यावर का कारवाई नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. कालच्या कँडल मार्चप्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात इम्तियाज जलील यांच्यासह कँडल मार्च काढणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यावर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
जलील यांच्यावर गुन्हा दाखल!
औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीतर्फे एमआयएमचे खासदार इम्तीयाज जलील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु आहे. दरम्यान गुरुवारी (9 मार्च) रोजी औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा भडकल गेटपर्यंत कँडल मार्च काढण्यात आला होता. यासाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली होती. मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तसेच असा मार्च काढू नयेत अशी नोटीस देखील पोलिसांकडून आयोजकांना देण्यात आली होती. मात्र तरीही जलील यांच्यासह हजारो लोकांनी रस्त्यावर उतरुन कँडल मार्च काढला होता. त्यामुळे या प्रकरणी इम्तियाज जलील यांच्यासह 1500 अनोळखी लोकांवर जमावबंदी आदेशाचं उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज निघणारा मोर्चा रद्द!
दरम्यान छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात आज शहर बंदची हाक दिली होती. सोबतच लोकविकास परिषदेतर्फे आज भडकलगेट ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र या मोर्च्याला पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याने मोर्चा रद्द करण्यात आला आहे. तसेच हा मोर्चा सोमवारी काढण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत अधिकृतरीत्या कोणतेही घोषणा झालेली नाही.
इतर महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल, विनापरवानगी काढला होता कँडल मार्च