मोठी बातमी! खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल, विनापरवानगी काढला होता कँडल मार्च
Chhatrapati Sambhajinagar : जलील यांच्यासह 1500 अनोळखी लोकांवर जमावबंदी आदेशाचं उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhajinagar News: औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचं धाराशिव (Dharashiv) नामांतराचा निर्णय झाल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्याकडून आंदोलन केले जात आहे. दरम्यान गुरुवारी (9 मार्च) इम्तियाज जलील यांनी शहरात कँडल मार्च काढला होता. मात्र याच कँडल मार्चला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण तरीही जलील यांनी कँडल मार्च काढल्याने त्यांच्यावर शहरातील सिटी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जलील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीतर्फे खासदार इम्तीयाज जलील यांचे नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु आहे. दरम्यान गुरुवारी (9 मार्च) रोजी औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीचे संयोजक मोहम्मद अय्युब जहागीरदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा भडकल गेटपर्यंत कँडल मार्च करीता पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र या कँडल मार्चची परवानगी सिटीचौक पोलिसांनी नाकारली होती. तसेच असा मार्च काढू नयेत अशी नोटीस देखील पोलिसांकडून देण्यात आली होती. मात्र तरीही जलील यांच्यासह हजारो लोकांनी रस्त्यावर उतरुन कँडल मार्च काढला. त्यामुळे या प्रकरणी जलील यांच्यासह 1500 अनोळखी लोकांवर जमावबंदी आदेशाचं उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'यांच्यावर' झाला गुन्हा दाखल!
खासदार इम्तीयाज जलील यांच्यासह औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समितीचे संयोजक अय्युब जहागीरदार, महमुझ उर्रहमान फारुकी, आरेफ हुसैनी, फेरोज खान, नासेर सिद्दीकी, मोहम्मद समीर बिल्डर, शकुर सालार, शारेक नक्षबंदी, कुनाल खरात, प्रांतोष वाघमारे, गंगाधर ढगे, गाजी सादोद्दीन उर्फ पप्पु कलानी, सलीम सहारा, वाजीद जहागीरदार, काकासाहेब काकडे, रफीक चिता, जमीर कादरी, मुंशी पटेल, रफत यारखान, नुसरत अली खान, हाशम चॉऊस, अबुल हसन हाशमी, परवेज अहमद, शकुर अहमद, बाबा बिल्डर, मोबीन अहमद, शोएब अहमद व औरंगाबाद नामांतर विरोधी संघर्ष समिती पदाधिकारी तसेच इतर 1000 ते 1500 बेकायदेशिर जमाव यांचे विरुध्द कलम 143 भा.दं.वि. व म.पो. का. 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.