एक चूक अनेकांना मनस्ताप, एकाच मृतदेहावर दोनवेळा अंत्यसंस्कार, लातुरातील घटना
लातूरमध्ये एका कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. यामुळे एकाच मृतदेहावर दोनवेळा अंत्यसंस्कार करण्यात आले.
लातूर : कोरोना संसर्गामुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रातील यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण आहे. रोज होणाऱ्या मृत्युमुळे यात आणखी भर पडत आहे. कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृतदेह पॅक करताना कर्मचाऱ्यांची एक चूक सर्वांनाच किती महागात पडू शकते याची प्रचिती लातूरमध्ये आली आहे. मृतदेहांमध्ये अदलाबदली झाल्याने एकच गोंधळ झाला. लातुरच्या वैद्यकीय महाविद्यलयात घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासन आणि नातेवाईक बराच काळ हतबल होते. सात तासानंतर खरी परस्थिती समोर आली.
लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शेळगाव येथील रुग्ण धोडिराम तोंडारे यांना दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना संसर्ग झाला होता. उपचार सुरु असताना काल रात्री त्यांचा मृत्यू झाला. याचवेळी आबासाहेब चव्हाण (वय 45) ह्या रुग्णाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावरही येथे उपचार सुरु होते. हा रुग्ण बीड जिल्ह्यातील हतोला या गावाचे रहिवासी होते. याच दरम्यान तिसऱ्या व्यक्तीचाही मृत्यू झाला. हे तीन मृतदेह कोरोना बाधित असल्यामुळे ते व्यवस्थित पॅक करण्यात आले. त्यावर नावाचा टॅग लावताना कर्मचाऱ्याची चूक झाली.
पहाटे नातेवाईक आल्यानंतर त्यांना मृतदेह दाखवण्यात आला. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे मृतदेह नीट न पहाता आमच्याच नातेवाईकाचा असल्याचे सांगण्यात आले. कागदपत्रांवर सही करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला आणि गोंधळ वाढला. धोडिराम तोंडारे यांच्यावर शेळगी येथे विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनामुळे चेहराही कोणी पाहिला नाही. दफनविधी करण्यात आला होता. हतोला येथील मृत रुग्णाच्या नातेवाईकनी अंतिमसंस्कार करण्यासाठी मृतदेह नेला होता. चेहरा पाहिला त्यावेळी त्यांना धक्का बसला. मृतदेह दुसऱ्याच व्यक्तिचा आला.
याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनास मिळाली. त्यानंतर धावपळ सुरु झाली. यात चार तास गेले. नेमके चुकले कुठे हे लक्षात आले. प्रशासन धावतपळत शेळगी येथे दाखल झाले. दफनविधि झालेला मृतदेह जेसीबीच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. तो मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर धोडिराम तोंडारे यांच्या मृतदेहवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हतोला येथील मृत रुग्ण आबासाहेब चव्हाण यांचा मृतदेह अंत्यसंस्कारसाठी त्यांच्या गावी नेण्यात आला.
या सगळ्या प्रकारात दोन कुटुबाला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. झालेली चूक ही भीतीतून, रुग्ण दगावल्याच्या धक्क्यातून झाली आहे. त्यासाठी आता वेगळी यंत्रणा निर्माण करतोय. यापुढे योगय ती खबरदारी घेतली जाईल, अशी प्रतिक्रिया अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली आहे.