Ramesh Bais : रमेश बैस महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल, मराठीतून घेतली राज्यपालपदाची शपथ
Ramesh Bais : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी आज राज्यपालपदाची (Governor) शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधीचा सोहळा पार पडला.
Ramesh Bais : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी आज राज्यपालपदाची (Governor) शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधीचा सोहळा पार पडला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. गंगापूरवाला (Sanjay V. Gangapurwala) यांनी बैस यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर (Rahul Narwekar), पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी राजभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
रमेश बैस यांनी महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल म्हणून आज पदभार स्वीकारला. रमेश बैस यांनी मराठीतून राज्यपालपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेला आणि कल्याणाला मी वाहून घेईन, अशी प्रतिज्ञा रमेश बैस यांनी घेतली. भगत सिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर रमेश बैस यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती.
Mumbai | Ramesh Bais took oath as the Governor of Maharashtra, in the presence of CM Eknath Shinde. pic.twitter.com/oEAMNDHg3N
— ANI (@ANI) February 18, 2023
Ramesh Bais : कोण आहेत रमेश बैस?
रमेश बैस यांचा जन्म जन्म 2 ऑगस्ट 1947 मध्ये मध्य प्रदेशातील रायपूरमध्ये झाला आहे. आता ते रायपूर छत्तीसगडमध्ये आहे. रमेश बैस यांची जुलै 2021 मध्ये झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. याआधी जुलै 2019 ते 2021 पर्यंत त्रिपुराचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आले होते तेव्हा त्यांना त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मध्य प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते.
Political career : रमेश बैस रायपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळा खासदार
रमेश बैस यांनी नगरपालिकेतून आपल्या राजकीय करिअरला सुरुवात केली होती. 1978 मध्ये ते सर्वप्रथम नगरपालिकेत निवडून आले होते. त्यानंतर 1980 ते 84 मध्ये मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य होते. पण 1985 मध्ये त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर 1989 मध्ये रायपूर येथील लोकसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला होता. ते रायपूर लोकसभा मतदारसंघातून सलग सात वेळा खासदार राहिले आहेत. रमेश बैस यांनी केंद्रातही राज्यमंत्रीपद भूषवले आहे. 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात बैस यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून काम केले होते. वाजपेयी सरकारच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या कार्यकाळात बैस यांनी पोलाद, खाणी, रसायने आणि खते, माहिती आणि प्रसारण या विभागाचा कार्यभार सांभाळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: