Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Walmik Karad : आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर केज जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
Santosh Deshmukh Case : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Murder Case) गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चांगलेच चर्चेत आले आहे. पोलिसांकडून (Beed Police) या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून अद्याप कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा (Walmik Karad) सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराडवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर केज जिल्हा व सत्र न्यायालयात (Kej Court) सुनावणी पार पडणार आहे.
वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये केज जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयाने कोठडी सुनावल्यानंतर कराडच्या वकिलाने कोर्टामध्ये लगेच जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जाला सीआयडीकडून कोर्टामध्ये आव्हान देण्यात आले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मकोका लागलेल्या करडची सीआयडीला चौकशी करायची आहे. म्हणून वाल्मिक कराडला जामीन देऊ नये, अशी विनंती सीआयडीने कोर्टाकडे केली होती. याच जामीन अर्जावर आज केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कराड समर्थकांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन
दरम्यान, वाल्मिक कराडवर मंगळवारी मकोका लावण्यात आला. यानंतर त्याचे समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. वाल्मिक कराडवर मकोका दाखल होताच कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आली. तर बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. यानंतर काल (दि. 18) बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आले. केज तालुक्यातील राजेगाव येथे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीवर चढून भगवान चौरे यांनी आंदोलन केले होते. कराडला जाणून बुजून या संपूर्ण प्रकरणात गोवले जात आहे. या प्रकरणाची योग्य रीतीने चौकशी करून कराडला न्याय मिळावा, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली.
इतर महत्त्वाच्या बातम्या