Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महानगरपालिकेकडून रेल्वे रूळांवर ओव्हरब्रिजसाठी सुधारित आराखडा सादर
पादचाऱ्यांना रुळ ओलांडण्यासाठी धोकादायक मार्गाने जाण्यापासून रोखण्यासाठी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस रेल्वे मार्गावर फूट-ओव्हरब्रिज बांधण्याचा सुधारित आराखडा कोल्हापूर महापालिकेने सादर केला आहे.
Kolhapur Municipal Corporation : पादचाऱ्यांना रुळ ओलांडण्यासाठी धोकादायक मार्गाने जाण्यापासून रोखण्यासाठी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस रेल्वे रुळांवर फूट-ओव्हरब्रिज बांधण्याचा सुधारित आराखडा कोल्हापूर महापालिकेने सादर केला आहे. मध्यवर्ती बसस्थानक (CBS) आणि शाहूपुरी या शहराच्या दोन प्रमुख केंद्रांमध्ये रेल्वे मार्ग आहे. अनेक पादचारी दोन्हीपैकी कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी चालत जातात.
परीख पूल भूयारी एकमेव मार्ग आहे जो बहुतेक वेळा खोळंबलेला असतो. पावसाळ्यात पाणी साचल्याने बंद होते. परीख पूल पर्याय नसल्यास पादचाऱ्यांना टर्मिनसवर जाण्यासाठी पायी जावे लागते. जेथे प्लॅटफाॅर्म ओलांडण्यासाठी फूट-ओव्हरब्रिज बांधण्यात आला आहे. त्यामुळे लोक अयोग्य मार्गाने सीबीएस ते शाहूपुरी दरम्यान रेल्वे रुळ ओलांडतात.
महापालिकेचे मुख्य शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सुधारित आराखडा सादर केला आहे. सुमारे 57 मीटर रुंदीचा एकेरी पूल उभारण्याची पूर्वीची योजना होती. आता, एस्केलेटरसह दोन लेन फूट-ओव्हरब्रिज आराखडा सादर करण्यात आला आहे. तांत्रिक मंजुरीसाठी रेल्वे अधिकारी हा आराखडा पुणे विभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करतील. रेल्वे कार्यकर्ते मोहन शेटे यांनी सांगितले की, "आम्ही 2015 पासून एफओबी प्रत्यक्षात येण्याची वाट पाहत होतो. जिल्हा नियोजन समितीने 1.30 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आणि उर्वरित रकमेची व्यवस्था कोल्हापूर महानगरपालिकेनं करायची आहे."
कोल्हापूर हे मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांपैकी एक मानले जाते. करवीर निवासिनी अंबाबाई, जोतिबा, बाळूमामा, खिद्रापूर आदींमुळे धार्मिक तसेच पर्यटनाच्या दृष्टीकोनातून कोल्हापूरचे नाव देशभरात आहे. मात्र, तुलनेत कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा अपेक्षित विकास साधता आलेला नाही. निधी मंजूर, पण कायद्याचे नाव सांगून कामाची अडवणूक असा प्रकार सुरु आहे.
कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेचे काम हाती घ्या
दरम्यान, कोल्हापूर - वैभववाडी या कोकण रेल्वेस जोडणाऱ्या मार्गाचे काम तत्काळ सुरू करण्यासह विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना दिले आहे. कोल्हापूर-वैभववाडी या कोकण रेल्वेस जोडणाऱ्या मार्गाचे काम तात्काळ सुरू करणे, नाशिक-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करणे, कोरोनानंतर सेवा बंद केलेल्या सर्व गाड्या पुर्ववत करणे, कोरोना काळानंतर विविध एक्सप्रेसचे बंद केलेले सर्व थांबे पूर्ववत सुरू करणे या मागण्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. कोकण रेल्वे मार्गावरील कुडाळ येथे पार्सल सेवा सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या