(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गव्याच्या हल्ल्यात कोल्हापूरच्या भुयेवाडीतील तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
कोल्हापूर शहरातील पंचगंगा घाट परिसरात ठाण मांडून बसलेला गव्याच्या हल्ल्यात एक तरुण जागीच ठार झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुयेवाडी इथं गव्याच्या हल्ल्यात एक तरुण जागीच ठार झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. गव्याला नैसर्गिक अधिवासात पाठवण्यासाठी पोलीस, वन विभाग त्याचबरोबर इतर संबंधित यंत्रणा प्रयत्न करत होत्या.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोल्हापूर शहराच्या उपनगर आणि पंचगंगा नदीच्या काठी वावरणारा गवा भुयेवाडीच्या दिशेने गेला होता. भुयेवाडी येथील एका उसाच्या शेतात गवा असताना काही तरुण त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत होते. अशावेळी गव्याने मागे फिरून हल्ला केला. या हल्ल्यात सौरभ संभाजी खोत या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर प्रल्हाद पाटील आणि शुभम पाटील हे दोघेजण जखमी झाले आहेत.
दोन ते तीन दिवसांपासून गव्याच्या मागे नागरिक विनाकारण हुल्लडबाजी करत होते. त्यामुळे गवा काहीसा आक्रमक झाला होता. त्याचाच परिणाम म्हणजे आज भुयेवाडीतल्या तरुणांवर हल्ला केला. यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर दोघे जण गंभीर जखमी झालेत. वन विभाग कोल्हापूर अग्निशमन दल आणि पोलीस यांच्या माध्यमातून गव्याला नैसर्गिक अधिवासात हुसकावून लावलं जात आहे. मात्र अशा वेळी नागरिकांनी नको ते धाडस करू नये असा आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
पंचगंगा नदी परिसरात गवा आला असून त्याने जामदार क्लबसमोरील राबाड्याच्या गवताळ माळातील झाडाझुडपात ठाण मांडले आहे. गवा नागरी वस्तीत येऊ नये म्हणून काळजी घेतली जात असून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात पाठवण्यासाठी वन विभाग, पोलिस, अग्निशमन दल, आपत्ती निवारण विभाग आणि वन्यजीव प्रेमी संघटना एकत्रित प्रयत्न करत आहेत. गवा महाकाय असल्याने त्याला हुसकावण्यासाठी मध्यरात्रीपासून प्रयत्न सुरू आहेत. त्याच्या परतीच्या प्रवासात कोणताही मानवी हस्तक्षेप होऊ नये यासाठी पोलीस आणि वन विभागाकडून खबरदारी घेण्यात आली.
इतर महत्त्वाच्या बातम्या :