मल्याळम दिग्दर्शक अली अकबर यांच्याकडून इस्लाम धर्माचा त्याग, सांगितलं 'हे' कारण
Malyalam Director Ali Akbar : मल्याळम दिग्दर्शक अली अकबर यांनी इस्लाम धर्माचा त्याग केला आहे.
Malyalam Director Ali Akbar : मल्याळम दिग्दर्शक अली अकबर यांनी इस्लाम धर्म सोडला आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर काही इस्लामवाद्यांकडून आनंद साजरा करण्यात आला. याच्या निषेधार्थ अली अकबर यांनी इस्लाम धर्माचा त्याग केला. जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघातात निधनाच्या पोस्ट आणि कमेंटच्या खाली अनेक इस्लामवाद्यांनी स्मायली इमोजी वापरल्याच्या कथित घटनांनंतर अकबर यांनी इस्लाम धर्माचा त्याग करण्याचा निर्णय घेतला.
दिग्दर्शक अली अकबर यांनी यापूर्वी सीडीएस बिपिन रावत यांच्या मृत्यूची खिल्ली उडवणाऱ्या इस्लामवाद्यांवर टीका करणारा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला होता. व्हिडिओवर आक्षेपार्ह कमेंटमुळे अकबर यांचे खाते एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आले. त्यानंतर अली अकबर यांनी दुसरे खाते उघडून त्यावर इस्लाम सोडत असल्याचे जाहीर केले. अकबर म्हणाले, ''ज्यांनी इमोजी टाकल्या त्यांच्या विरोधात बोलल्यानंतर पाच मिनिटांतच खाते ब्लॉक करण्यात आले.''
अकबर पुढे म्हणाले की, मोठ्या इस्लामिक नेत्यांनीही शूर लष्करी अधिकाऱ्यांचा अपमान करणाऱ्या ‘देशद्रोही’ अशा कृतींना विरोध केला नाही आणि हे आपण स्वीकारू शकत नाही. आपला धर्मावरील विश्वास उडाला आहे. त्यांनी फेसबुकवर यासंबंधित व्हिडिओ पोस्ट केला आहे. ''आजपासून मी मुस्लिम नाही. मी भारतीय आहे. भारताविरुद्ध हजारो हसतमुख इमोजी पोस्ट करणाऱ्या लोकांना हेच माझे उत्तर आहे,'' असे अकबर यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
या पोस्टवर फेसबुकवरील मुस्लिम समाजाकडून तीव्र टीका झाली आणि काहींनी अपमानास्पद भाषा देखील वापरली. दरम्यान, अनेक युजर्सने अकबर यांना पाठिंबा दिला आणि अकबर यांना शिवीगाळ करणाऱ्या नेटकऱ्यांना फटकारले. ही पोस्ट नंतर फेसबुकवरून काढून टाकण्यात आली असली तरी ती व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे. नंतर, अकबर यांनी आणखी एक पोस्ट केली ज्यामध्ये त्यांनी म्हटले, "सीडीएसच्या मृत्यूवर हसणाऱ्यांना राष्ट्राने ओळखले पाहिजे आणि त्यांना शिक्षा केली पाहिजे." या पोस्टवरही त्यांना पाठिंबा देणाऱ्या तसेच विरोधी कमेंट करणाऱ्या अनेक प्रतिक्रिया आल्या.
टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत अकबर म्हणाले की, ''सोशल मीडियावर अनेक देशविरोधी कारवाया होतात आणि रावत यांच्या मृत्यूवर हसणे हे त्याचे ताजे उदाहरण आहे. हसत इमोटिकॉनसह कमेंट करणारे आणि रावत यांच्या मृत्यूची बातमी साजरी करणारे बहुसंख्य वापरकर्ते मुस्लिम होते. त्यांनी हे केले कारण रावत यांनी काश्मीरमध्ये पाकिस्तान आणि अतिरेक्यांविरुद्ध अनेक कारवाया केल्या होत्या. एका धाडसी अधिकाऱ्याचा आणि देशाचा अपमान करणाऱ्या या सार्वजनिक पोस्ट्स पाहिल्या तरी, एकाही मोठ्या मुस्लिम नेत्याने प्रतिक्रिया दिली नाही. मी अशा धर्माचा भाग होऊ शकत नाही.''
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Wasim Rizvi : वसीम रिझवींनी इस्लाम सोडून स्वीकारला हिंदू धर्म, काय आहे कारण, कोण आहेत रिझवी?
- अंतराळातही भारतीय पदार्थांचा डंका, अंतराळावीरांची चमचमित भारतीय अन्नाला पसंती
- Omicron Variant : दिलासादायक! फायझर लसीचा बूस्टर डोस ओमायक्रॉन व्हेरियंटवर 90 प्रभावी, संशोधनात उघड
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha