अकोल्यातील सेलेब्रिटी 'चाँद' बोकड, खरेदीसाठी 10 लाखांवर बोली
गेल्यावर्षी ईदला या बोकडावर 5 लाखांपर्यंतची बोली लागली होती. मात्र यंदा मालकाने याची किंमत 10 लाखांपर्यंत केली आहे. बोकडाच्या खरेदीसाठी आता अकोल्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांतून विचारणा होत आहे.
अकोला : बकरी ईदला 'कुर्बानी' म्हणून बोकड बळी देण्याची प्रथा आहे. मुस्लिम धर्मियांमध्ये या 'कुर्बानी'च्या बोकडाचं महत्व मोठं असतं. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील तामशीचा बोकड सध्या मुस्लीम बांधवांसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे. 'चाँद' असं 'सिलेब्रिटी' बोकडाचं नाव आहे.
दोन वर्षाचा हा बोकड गणेश काळे यांच्या मालकीचा आहे. या बोकडाच्या कपाळ आणि पोटावर चंद्रकोर आहे. 'चंद्रकोर', '786' या गोष्टींचं मुस्लिम धर्मियांमध्ये मोठं महत्व आहे. त्यामुळे दुरवरुन या बोकडाच्या खरेदीसाठी गणेश काळेंना विचारणा होत आहे. अशी चिन्ह असलेल्या बोकडांची कुर्बानी पवित्र मानली जाते. त्यामुळेच अशा बोकडांना लाखोंची किंमत मिळते.
तामशीच्या काळे बंधुंचा बटवाडी शिवारात 'गोट फार्म' आहे. त्यांच्या 'गोट फार्म'वर 'उस्मानाबादी' जातीचे बोकड आणि शेळ्यांचं संगोपन गणेश यांनी केलं आहे. यातच दोन वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या एका बोकडानं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. जन्मत:च या बोकडाच्या कपाळ आणि पोटावर अर्ध चंद्रकोर आहे. गणेश यांच्या 'फार्म'मधील सर्व बोकडांमध्ये त्यांचा हा 'चाँद' नामक बोकड लाडका झाला आहे. अतिशय शांत असणारा हा बोकड अलिकडेच दोन पाय खांद्यावर देत ओळखीच्या लोकांना अलिंगणही देतो.
वर्षभरापूर्वी गणेश यांनी 'सोशल मीडिया'वर या बोकडाचे फोटो-व्हिडीओ व्हायरल केले. त्यानंतर त्यांच्या बोकडाला पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. गेल्यावर्षी ईदला या बोकडावर 5 लाखांपर्यंतची बोली लागल्याचं गणेश यांनी सांगितलं.
मात्र, त्यांनी मागच्या वर्षी 'चाँद'ला विकण्यास नकार दिला. यावर्षी त्यांनी 'चाँद'ची किंमत 10 लाखांपर्यंत केली आहे. त्यांना या बोकडाच्या खरेदीसाठी आता अकोल्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांतून विचारणा होत आहे. हैदराबादमधील एका बकरी व्यापाऱ्यांनंही त्यांच्याशी या बोकडाच्या खरेदीबाबत उत्सुकता दाखवली आहे.
त्यामुळे कपाळावर चंद्रकोर असणारा हा चाँद नावाचा बोकड गणेश यांचे स्टार बदलवणार का? हा उत्सुकतेचा प्रश्न आहे.