मराठा समाजावर अन्याय म्हणत मराठा क्रांती मोर्चाची काळी रंगपंचमी; सोलापुरात भाजप नेत्यांविरुद्ध आक्रोश
सोलापूर महापालिकेत अडीच वर्षापैकी सव्वा वर्षे मराठा समाजाला महापौरपद द्यावे. तसेच जिल्हा परिषदेतही कुणबी मराठा समाजाला अध्यक्ष करावे, अशी आमची मागणी आहे.

सोलापूर: राज्यभरात आज रंगपंचमीच्या (Rangpanchami) सणाचा उत्साह पाहायला मिळत असून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात रंगांची उधळण करत पिचकारीने रंगपंचमीचा आनंद साजरा केला जातोय. मात्र, सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी करण्यात आली आहे. सोलापूर (Solapur) महापालिकेत मराठा समाजाला महापौर पदाची संधी डावलल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांविरोधात हे आंदोलन करण्यात आलंय. सोलापुरात 1993 नंतर पहिल्यांदाच मराठा (Maratha) समाजाला महापौरपदाची संधी आली होती. मात्र, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्वतःच्या नातेवाईकांना ही संधी दिल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
सोलापूर महापालिकेत अडीच वर्षापैकी सव्वा वर्षे मराठा समाजाला महापौरपद द्यावे. तसेच जिल्हा परिषदेतही कुणबी मराठा समाजाला अध्यक्ष करावे, अशी आमची मागणी आहे. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर सोलापूरसह राज्यभरात आंदोलन करणार, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी एबीपी माझाशी बोलताना मांडली. दरम्यान, सोलापुरात यंदा महापौरपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे, महापौरपदासाठी मोठी रस्सीखेंच होती. त्यानुसार, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात येथे भाजपने आपला महापौर बसवला आहे.
भाजपचे सर्वाधिक 87 नगरसेवक
सोलापूर महापौरपदी भाजपच्या विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेनेचे प्रियदर्शन साठे आणि एमआयएमचे तौफिक हतुरे यांनी शेवटच्या मिनिटात अर्ज माघारी घेतल्याने पीठासीन अधिकारी यांनी बिनविरोध झाल्याची घोषणा केली आहे. तर, उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांची सुद्धा बिनविरोध निवड झाली आहे. सोलापूर महानगरपालिकेत 87 नगरसेवक निवडून आल्याने भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपला स्पष्ट बहुमत आहे. विशेष म्हणजे येथे एमआयएमचे 8 नगरसेवक निवडून आल्याने एमआयएम हा दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर प्रबळ विरोधी पक्ष म्हणूनही एमआयएमकडेच धुरा आली आहे.
सोलापुरात काँग्रेसचे केवळ 2 नगरसेवक
सोलापूर महानगरपालिका सभागृहातील 102 नगरसेवकांपैकी काँग्रेसचे फक्त दोनच नगरसेवक निवडून आले आहेत. एकेकाळी एकहाती सत्ता असलेल्या काँग्रेसवर फक्त दोनच नगरसेवक घेऊन बसण्याची वेळ सोलापुरात आल्याने भाजपची ताकद शहरात वाढल्याचं स्पष्ट झालं. दुसऱ्या क्रमांकावर एममआयएमने बाजी मारत पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिलीय.
हेही वाचा






















