चंद्रपूरसाठी केंद्रीय मंत्र्यांची मोठी घोषणा; मोठ्या क्षमतेची पेट्रोलियम रिफायनरी स्थापन करणार
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri petroleum minister) यांनी चंद्रपुरात महत्त्वाची घोषणा केली आहे.
Chandrapur News Updates: केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri petroleum minister) यांनी चंद्रपुरात महत्त्वाची घोषणा केली आहे. चंद्रपुरात 20 मिलियन मेट्रिक टन वार्षिक क्षमतेची पेट्रोलियम रिफायनरी (petroleum refinery) स्थापन करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पुरी यांची पक्षाकडून नियुक्ती झाली आहे. पेट्रोलियम खात्याने 252 पासून 400 मिलियन मेट्रिक टन वार्षिक रिफायनिंग क्षमता वाढविल्याची माहिती देत मागच्या राज्य सरकारने रत्नागिरी येथील प्रकल्प रखडविल्याची टीका त्यांनी केली. क्षमता वाढविण्याच्या याच प्रयत्नात आता 20 मिलियन मेट्रिक टन क्षमतेची रिफायनरी चंद्रपुरात स्थापन करू असं आश्वासन पुरी यांनी दिले.
चंद्रपूर भाजपच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही घोषणा केली. राज्यात लोकसभेच्या भाजपने गमावलेल्या जागा पुन्हा खेचून आणण्यासाठी पक्षाने विशेष अभियान राबविले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत राजकीय स्थिती अनुकूल असताना भाजपने चंद्रपूरची जागा गमावली होती. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात राज्यात एकाच ठिकाणी काँग्रेसला यश मिळाले होते. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी 3 दिवस लोकसभा क्षेत्रात मुक्कामी आहेत.
चंद्रपुरात 20 वीस मिलियन मॅट्रिक टन इतक्या क्षमतेची रिफायनरी उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी केली तर त्याचवेळी त्यांनी कोकणातील रिफायनरी रखडल्याबद्दल नाराजी देखील व्यक्त केली. पण पुरी यांच्या या घोषणेनंतर आता कोकणातल्या रिफायनरीचे भवितव्य काय? चंद्रपुरात रिफायनरी उभारली गेल्यास कोकणात रिफायनरी उभारणार की नाही? असा सवाल देखील आता विचारला जात आहे.
कोकणातल्या रिफायनरीसंदर्भातही केलं होतं सूचक वक्तव्य
कोकणातल्या रिफायनरीबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री पुरी यांनी सूचक वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्रात कुठेही आणि पश्चिम तसेच दक्षिण किनारपट्टीवरील कोणत्याही ठिकाणी रिफायनरी प्रकल्प होऊ शकतो असं त्यांनी म्हटलं होतं. केवळ रत्नागिरीच नाही तर दक्षिण किंवा पश्चिम किनारपट्टीवरील कोणत्याही भागात आणि कोणत्याही राज्यात रिफायनरी प्रकल्प होऊ शकतो, अशा आशयाचे वक्तव्य केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी केलं होतं. केंद्रीय मंत्र्यांचे हे वक्तव्य म्हणजे राज्य सरकारला सूचक इशारा आहे का? अशी चर्चा देखील यानंतर सुरु झाली होती.
इतर महत्वाच्या बातम्या