Refinery in Konkan : कोकणातील असलेले उदय सामंत उद्योग मंत्री (Uday Samant) झाल्यानंतर आता कोकणातल्या रिफायनरीसाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. त्यानुसार आता विरोध असलेल्या ठिकाणी प्रबोधन करण्याचं काम केलं जाणार आहे. स्थानिक प्रशासन असेल किंवा कंपनी यांच्यामार्फत प्रबोधन पर कार्यक्रम घेतले जाणार आहेत. ज्या गावांमध्ये हा प्रकल्प होणार आहे तसेच ज्या घरांमध्ये प्रकल्पाला विरोध आहे, त्या ठिकाणी आता किमान 50 कुटुंबांमागे दोन दोन युवक युवतींची नेमणूक केली जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून आता प्रकल्पबाबत प्रबोधन केले जाणार आहे. तीन महिने हा कार्यक्रम सुरु असेल. शिवाय आता सोशल मीडियाचा वापर देखील प्रकल्पाचे प्रबोधन करण्यासाठी केला जाणार आहे.
नेमका प्रबोधनाचा कार्यक्रम काय असेल?
1 ) प्रकल्पाची पुरेशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांना नाही त्यासाठी प्रकल्पाची पूर्ण माहिती वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांना देण्याकरता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जावे.
2. तळागाळातील ग्रामीण भागाशी संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांना प्रकल्पाबाबत माहिती देण्याकरिता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन.
3. बाधित गावातील घराघरात जाऊन प्रकल्पाची माहिती देण्याकरिता पन्नास कुटुंबामागे किमान दोन युवक-युवतींची नियुक्ती करून पुढील तीन महिने प्रबोधनाचा कार्यक्रम राबवणे. याकरिता परिसरात समर्थनाचे काम करणाऱ्या सामाजिक संस्थांची मदत घेता येईल.
4.वर्तमानपत्रातील जाहिरातींद्वारे, चुकीच्या बातम्यांचा परामर्श घेऊन प्रकल्पाबाबत विस्तृत माहिती जनतेसमोर मांडावी. सोशल मीडियामध्ये व्हिडीओ क्लिप्स व इतर माहितीद्वारे योग्य ते प्रबोधन करावे.
5. बाधित गावातील लोकप्रतिनिधींना पानीपतसारख्या प्रकल्पाचा दौरा करून प्रत्यक्ष प्रकल्प दाखवणे.
6. कौशल्य विकास प्रशिक्षण यंत्रणेद्वारेसंबंधित गावातील व्यक्तींना रोजगार व नोकऱ्या कशा उपलब्ध करून देता येतील याकरता कंपनी संचलित भुवनेश्वर येथील कौशल्य विकास केंद्राचा दौरा स्थानिक पत्रकार, शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी यांकरिता आयोजित करणे.
7. परिसरातील सर्व महिला बचत गटांद्वारे महिलांच्या प्रबोधनाचा एक कालबद्ध कार्यक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी करणे, जेणेकरून परिसरातील सर्व महिलांना या प्रकल्पापासून होणारे फायदे समजतील तसेच प्रकल्पामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत याची खात्री पटवून देता येईल.
8. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम कंपन्यांच्या सीएसआर अंतर्गत बाधित गावांकरिता वैद्यकीय शिबिराचे आयोजन करणे, रुग्णवाहीका सेवेचा प्रबंध करणे, बाधित गावातील महिला बचत गटांना रोजगार निर्मितीसाठी शिवण यंत्रांचे वाटप करणे.
बाधित गावात आवश्यक तेथे पाणीपुरवठा योजना अथवा पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था करणे. बाधित गावातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करावे.
इतर महत्वाच्या बातम्या