भंगारवाल्याची संपत्ती कोट्यवधींची कशी झाली? आज खुलासा करणार; नवाब मलिकांना हाजी अराफत शेख यांचं आव्हान
Haji Arafat Sheikh: मुंबईतील क्रूझ ड्रग्ज केस प्रकरणावरुन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि भाजप नेत्यांमध्ये दररोज आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरु आहे.
Haji Arafat Sheikh: मुंबईतील क्रूझ ड्रग्ज केस प्रकरणावरुन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि भाजप नेत्यांमध्ये दररोज आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरु आहे. नवाब मलिक आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील आरोप प्रत्यारोपामध्ये आता भाजप नेते हाजी अराफत शेख यांची एन्ट्री झाली आहे. नवाब मलिक यांच्याविरोधात पुरावे देण्यासाठी पत्रकार परिषादांची माळ लावणार असल्याचं हाजी अराफत शेख यांनी सांगितलं आहे. शुक्रवारी, दुपारी तीन वाजता त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये ते राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांचे उत्तर देत, खळबळजनक खुलासे करणार असल्याचं समजतेय.
अल्पसंख्यांक समाजाला अडीच वर्षे वेठीस धरून अधोगतीच्या मार्गावर नेणारे भ्रष्ट मंत्री नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मन-मानी पद्धतीने केलेली कामे, वक्फ बोर्डाची जागा हडपने, गैरव्यवहार करने व स्वतःच्या स्वार्थापोटी वक्फ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणे यासंबंधी खुलासे करणार असल्याचं हाजी अराफत शेख यांनी सांगितलं. सुरुवात नवाब मलिक यांनी केलीये, अखेर हाजी अराफत शेख करेल, असं ते म्हणाले. आजपासून मी पत्रकार परिषदांचं सत्र सुरू करणार आहे. नवाब मलिकांसोबत कोण-कोण आहेत? हे समोर आणणार. आज अल्पसंख्याक समाजाच्या मुद्द्यावर दुपारी मुंबईत पहिली पत्रकार परिषद होईल. त्यानंतर दोन दिवसांनी मलिकांचे अंडरवल्ड कनेक्शन समोर आणणार. त्यानंतर भंगारवाल्याची संपत्ती कोट्यवधींची कशी झाली, याचा खुलासा करणार आहे. मग चरस मलिक कोणाला म्हणतात, यावर भाष्य करेन. तसेच कोणाची मुलगी कोणासोबत पळून गेली, कोणाचा मुलगा रशियाच्या मुलीला घेऊन पसार झाला. हे समोर आणणार आहे. जर चाललेल्या गोष्टी थांबल्या नाहीत तर आम्ही सगळं समोर आणणार, असं वक्तव्य हाजी अराफत शेख यांनी केलं आहे.
नवाब मलिक यांनी काय केला होता आरोप?
नवाब मलिक यांनी आरोप केला की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाजी अराफत यांच्या धाकट्या भावाला वाचवण्यासाठी आणि बनावट नोटांच्या रॅकेटला संरक्षण देण्याचे काम केले. नवाब मलिक यांच्या आरोपानंतर भाजप नेते हाजी अराफत शेख यांनीही या लढ्यात उडी घेतली. नवाब मलिकसोबत माझा भाऊ इम्रान शेख याचा फोटो असल्याचे अराफत यांनी सांगितले. ती त्याच्या लग्नात सामील आहे. मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केक कापलाय. ही सर्व चित्रे आहेत. माझ्याकडे बॉम्ब नाही पण नवाब मलिकांची छोटी-मोठी सर्व प्रकरणे मी उघडकीस आणणार, असं हाजी अराफत शेख यांनी सांगितले.