(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोरोनावर मात करून आरोग्याची गुढी उभारूया, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून गुढी पाडवा, नववर्षाच्या शुभेच्छा
येणारे नववर्ष आपल्या सर्वांसाठी आरोग्यदायी, सुख-समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल, असा विश्वास आहे. या आरोग्यदायी गुढीसाठी आणि मराठी नववर्ष प्रारंभाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
मुंबई : कोरोनावर मात हिच आता आरोग्याची गुढी असेल. त्यासाठी सर्वांनीच एकमेकांची काळजी घ्यावी. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे ही त्रिसुत्री पाळावी, असं आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी साजरा होणाऱ्या गुढी पाडव्याच्या आणि नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट गरजेची आहे. आरोग्य सेवक, परिचारिका, डॉक्टर्स यांच्यासह विविध यंत्रणातील कोविडयोद्धे अहोरात्र राबत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना साथ म्हणून गुढी पाडव्याच्या सणादिवशीही आपण घरीच थांबुया. नेहमीच्या प्रथा-परंपरांना थोडं बाजूला ठेवून एकमेकांना शुभेच्छा देऊन सण साजरा करूया. गर्दी नकोच, मास्क अनिवार्य आणि वारंवार हात धुणे या त्रिसुत्रीतून कोरोनावर मात करणे ही आरोग्याची गुढी यावर्षी महत्वाची आहे. यातून येणारे नववर्ष आपल्या सर्वांसाठी आरोग्यदायी, सुख-समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल, असा विश्वास आहे. या आरोग्यदायी गुढीसाठी आणि मराठी नववर्ष प्रारंभाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
Gudhipadva Festival 2021 : गुढीपाडवा सणानिमित्त राज्य सरकारची नियमावली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनही गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभेच्छा
“वसंतऋतुच्या आगमनासोबत सुरु होणारं मराठी नववर्ष आणि त्यानिमित्तानं साजरा होणारा गुढी पाडव्याचा सण सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. मनातील नवनिर्मितीच्या कल्पनांना चैत्रपालवीची संजीवनी मिळो. जीवनात यशाच्या उंच गुढ्या उभारण्याची स्वप्ने पूर्ण होवोत. यशाच्या त्या उंच गुढ्यांमध्ये एक गुढी ‘कोरोनामुक्ती’च्या विजयाचीही असो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गुढी पाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेला गुढीपाडव्याचा सण सर्वांनी आनंदात, उत्साहात, कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करुन साजरा करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, भारतीय आणि मराठी संस्कृतीत गुढी पाडव्याच्या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. निसर्गाशी नातं सांगणारा हा सण आहे. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतुचं आगमन होतं. झाडांची सुकी पानं गळून पडतात. नवीन पालवी फुटते. निसर्गातील या आशादायी बदलांचं उत्साहानं स्वागत करण्याचा हा सण आहे. कोरोनामुळे यंदाचा गुढीपाडवा सामूहिकपणे साजरा करता येत नसला तरी, कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करुन यंदा गुढीपाडवा साधेपणानं साजरा करुया. कोरोनाला हरवल्यानंतर पुढच्या वर्षीचा गुढीपाडवा सर्वांनी एकत्र मिळून साजरा करण्याचा निर्धार करुया, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.